

म्युनिसिपल बॉण्डच्या यशानंतर नाशिक महापालिकेचा २०० कोटींचा ग्रीन बॉण्ड प्रस्ताव
बीएसई आणि एनएसईमध्ये फेब्रुवारी अखेरीस सूचीबद्ध होण्याची तयारी
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी पाणीपुरवठा प्रकल्पांना प्राधान्य
विल्होळी व पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रांच्या क्षमतावाढीवर भर
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'म्युनिसिपल बॉण्ड'ला घवघवीत प्रतिसाद लाभल्यानंतर आता महापालिकेने दोनशे कोटींचे 'ग्रीन बॉण्ड' बाजारात आणण्याची तयारी केली आहे. फेब्रुवारी अखेरीस बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) मध्ये सूचीबद्ध केले जाणार आहे. त्यासाठी 'सेबी'कडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
या माध्यमातून पाणीपुरवठा विषयक कामे हाती घेतली जाणार आहेत. नाशिकमध्ये २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांना आता वेग आला आहे. सिंहस्थांतर्गत नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे तब्बल ३० हजार कोटींची कामे केली जाणार आहेत.
केंद्र व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर नाशिक महापालिकेलादेखील सिंहस्थ कामांमध्ये हिस्सा द्यावा लागणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात ४२५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. आतापर्यंत २० हजार कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
स्व-हिश्श्यापोटी महापालिकेला मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने म्युनिसिपल बॉण्ड व ग्रीन बॉण्डच्या माध्यमातून निधी उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या कार्यक्रमात दोनशे कोटींचे म्युनिसिपल बॉण्ड उभारण्यात आले आहेत.
खासगी प्लेसमेंटद्वारे एनएमसी क्लिन गोदावरी बॉन्डस् २०३० सिरिज १ नावाने बॉन्ड इश्यु झाल्यानंतर पाच वर्षांसाठीच्या म्युनिसिपल बॉन्डला ७.८० टक्के व्याजदर मिळाला. म्युनिसिपल बॉन्डचे यशस्वी लिस्टिंग झाल्यानंतर आता ग्रीन बॉण्डमधून दोनशे कोटी रुपये भांडवल उभारण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
'ग्रीन बॉण्ड' मधून ही कामे होणार
ग्रीन बॉण्डमधून उभारल्या जाणाऱ्या निधीतून विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमतावाढ, विल्होळी केंद्र ते नाशिकरोड व गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी, पाथर्डी फाटा येथून रविशंकर मार्ग तसेच पुढे तपोवनात थेट पाइपलाइन योजना राबविली जाणार आहे. पंचवटी जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतावाढीचे काम निधीतून केले जाणार आहे.