Nashik Ganesh Visarjan| मूर्तींची विल्हेवाट; महापालिकेसमोर पेच

Nashik Municipal Corporation | मलनिस्सारण केंद्रांतील कामांमुळे पारंपारिक जागा अनुपलब्ध; पर्यायी व्यवस्थेचे आव्हान
Nashik Ganesh Visarjan
Nashik Ganesh VisarjanPudhari Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गणेश विसर्जनाच्या दिवशी महापालिकेकडून संकलित करण्यात येणाऱ्या सुमारे सव्वादोन लाख गणेशमूर्तींची विल्हेवाट लावण्याचा पेच निर्माण झाला आहे. दरवर्षी संकलित केलेल्या गणेशमूर्ती मलनिस्सारण केंद्रांच्या परिसरात खड्डे खोदून विधिवत पुरल्या जातात. मात्र, यंदा शहरातील विविध मलनिस्सारण केंद्रांमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामे आणि प्रकल्पांचे अपग्रेडेशन सुरू असल्याने या परिसरात गणेशमूर्तींची विल्हेवाट लावू नये, असे पत्र मलनिस्सारण व यांत्रिकी विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.

Nashik Ganesh Visarjan
Nashik Simhastha Kumbh Mela | नाशिक सिंहस्थ कामांमध्ये निष्काळजीपणा; 1,230 कोटींच्या रस्ते कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह!

त्यामुळे संकलित होणाऱ्या लाखो गणेशमूर्तींची विल्हेवाट कुठे आणि कशा पद्धतीने लावायची, असा प्रश्न महापालिकेसमोर उभा राहिला आहे. महापालिकेकडून दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन दिले जाते. गोदावरी नदीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींचे विसर्जन केल्यास नदीच्या प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता असल्याने मूर्तींचे नदीत विसर्जन टाळण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून नैसर्गिक तसेच कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था केली जाते.

या ठिकाणी नागरिकांकडून गणेशमूर्ती संकलित केल्या जातात. दरवर्षी संकलित होणाऱ्या सुमारे सव्वादोन ते अडीच लाख मूर्तींची जुन्या विहिरी अथवा नदीकाठावरील मलनिस्सारण केंद्राच्या परिसरात खड्डे खोदून विधिवत विल्हेवाट लावली जाते.

मात्र, यंदा मलनिस्सारण केंद्रांमध्ये नवीन प्रकल्पांच्या उभारणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे उपलब्ध जागेवरही मोठा ताण आहे. नवीन मलनिस्सारण प्रकल्पांच्या मशिनरी युनिटसाठी जागा राखीव करण्यात आली आहे. तसेच प्रकल्प उभारणाऱ्या एजन्सीकडून विविध ठिकाणी साहित्य ठेवण्यात आले असून, कामगारांसाठी शेडही उभारण्यात आले आहेत.

त्यातच सध्या कार्यरत असलेल्या जुन्या मलनिस्सारण केंद्रांच्या पाइपलाइन तसेच मशिनरीच्या केबल्स भूमिगत करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत या परिसरात गणेशमूर्तींची विल्हेवाट लावल्यास सुरू असलेल्या मलनिस्सारण केंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांबरोबरच नवीन प्रकल्पांच्या कामातही अडथळा निर्माण होण्याची शक्यता मलनिस्सारण विभागाने व्यक्त केली आहे.

Nashik Ganesh Visarjan
Maternity Benefit Scheme | कुपोषणमुक्तीकडे मोठे पाऊल; लाभार्थी संख्येत नाशिक जिल्हा राज्यात 'नंबर वन'

त्यामुळे मलनिस्सारण केंद्रांच्या परिसरात गणेशमूर्ती आणून त्यांची विल्हेवाट लावू नये, अशा सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्याची मागणी विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

तसेच संकलित गणेशमूर्तींच्या विल्हेवाटीसाठी स्वतंत्र नियोजन करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यंदा संकलित होणाऱ्या गणेशमूर्तींच्या विल्हेवाटीसाठी पर्यायी जागा निश्चित करणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने त्यांची प्रक्रिया करणे, हे संबंधित विभागांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news