

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या २८ प्रमुख रस्त्यांच्या कामांना वेग आला असतानाच त्यांच्या गुणवत्ता तपासणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांकडून (पीएमसी) रस्ते कामांची तपासणी आयआयटी मुंबईने तयार केलेल्या चेकलिस्टनुसार केली जात
नसल्याचे महापालिकेच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या निदर्शनास आले आहे.
गुणवत्ता नियंत्रण विभागाने संगम पूल-मिरची हॉटेल, एक्सएलओ चौक-गंगापूर चौक आणि टाकळी एसटीपी-नांदूरगाव चौक-राजस्वी स्वीट्स या तीन प्रमुख रस्त्यांच्या कामांची पाहणी केली.
या पाहणीत काही ठिकाणी 'काँक्रीट पोर कार्ड' आणि 'डेली काँक्रीट रजिस्टर'मधील नोंदींमध्ये तफावत आढळून आली. तसेच, वेगवेगळ्या तारखांना झालेल्या कामांचे स्वतंत्र टॅगिंग, आरएफआय (रिक्वेस्ट फॉर इन्स्पेक्शन), आवश्यक कागदपत्रे आणि तपासणीचा संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट झाले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पहिल्या टप्प्यात सुमारे १,२३० कोटी रुपये खर्चून शहरातील २८ रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये काही रस्त्यांचे रुंदीकरण करून काँक्रीटीकरण, तर काही रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे.
ही कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. काही कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे तसेच घाईघाईने कामे उरकण्याचे प्रकार निदर्शनास आल्यानंतर महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या कामांचा दर्जा आणि गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह मे. फोर्ट्रेस इन्फ्राकॉन लिमिटेड आणि मे. पेव्हटेक कन्सल्टिंग इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड या पीएमसी संस्थांवर सोपवण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी अपेक्षित पद्धतीने गुणवत्ता तपासणी होत नसल्याचे गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या पाहणीत आढळले. या पार्श्वभूमीवर गुणवत्ता नियंत्रण विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून काटेकोर तपासणीचे निर्देश दिले आहेत.
कामांच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवताना प्रत्येक टप्प्याची स्वतंत्र नोंद असणे आवश्यक आहे. त्यासाठी वेगवेगळ्या तारखांना झालेल्या कामांचे टॅगिंग, आरएफआय, काँक्रीट पोर कार्ड, डेली काँक्रीट रजिस्टर तसेच इतर आवश्यक कागदपत्रांचा संपूर्ण तपशील उपलब्ध असणे अपेक्षित आहे. मात्र, पाहणीदरम्यान या प्रक्रियेत त्रुटी आढळल्याने गुणवत्ता नियंत्रण विभागाने यंत्रणांना दक्षतेने कामच्या सूचना दिल्या आहेत.