

Nashik Municipal Corporation Election 2026
नाशिक : राजकीय पक्षांनी उमेदवारी नाकारलेले नाराज तसेच इच्छुकांसह हौसे नवसे अशा २०८ जणांनी अपक्ष उमेदवारी करीत निवडणुकीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात प्रभाग २९ मधील मुकेश शहाणे यांचा दणदणीत विजय वगळता इतरांना अपयशाला सामोरे जावे लागले आहे.
महापालिका निवडणूक जाहीर होताच इच्छुकांची भाऊगर्दी वाढली. अनेकांनी विविध राजकीय पक्षांशी संपर्क करत उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डिंग लावत होते. मात्र, जागा १२२ व इच्छुकांची संख्या हजारांवर होती. त्यामुळे राजकीय नेत्यांसमोरही कोणाला उमेदवारी द्यावी व कोणाला नाही, असा पेच निर्माण झाला होता. त्यात बरेच तावून सुलाखून उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यात पक्षातील पदाधिकारी व नेत्यांचे जवळचे कार्यकर्ते इच्छुकांमध्ये असल्याने नेमके उमेदवार निवडण्यासाठी नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागली होती. त्यात अनेक इच्छुक नाराज झाले. मात्र उमेदवारी करण्यावर ठाम राहिले. त्यामुळे अनेकांनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीत सत्ता, पैसा आणि वर्चस्व याची जोड असणे आवश्यक असते हे माहीत असतानाही अनेकांनी रिंगणात उडी मारली. मात्र, निवडणूक रिंगणात उतरून काहीही उपयोग झाला नाही. शेवटी अपयश पत्कारावे लागले.
अपक्षांमध्ये प्रभाग २९ मधून मुकेश शहाणे यांनी उमेदवारी दाखल केली होती. मुळात शहाणे हे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते मानले जातात. मात्र पक्षातंर्गत गटबाजीमुळे त्यांनी तयारी केली असतानाही भाजपने उमेदवारी दिली नाही. त्यांना डावलून दीपक बडगुजर यांना भाजपने उमेदवारी दिली. मात्र मुकेश शहाणे आपल्या उमेदवारीचा निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात त्यांच्या प्रयत्नांना मतदार राजांनी न्याय दिला. मुकेश शहाणे यांना पक्षाने नाकारले, मात्र प्रभागातील जनतेने डोक्यावर घेत विजयाचा मुकुट घातला. त्यातही त्यांना दणदणीत मताधिक्य दिले.
या निवडणुकीत माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती सलीम शेख, शिवाजी गांगुर्डे, संजय साबळे, संजय चव्हाण यांच्यासह कारागृहातून निवडणूक लढविणारे रिपब्लिकन पक्ष (आठवले गट)चे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, त्यांच्या स्नुषा दीक्षा लोंढे, भाजपचे दिनकर आढाव, संभाजी मोरूस्कर, भाजपचे बंडखोर शशिकांत जाधव, अरुण पवार, काँग्रेसच्या वत्सला खैरे, शिंदे गटाचे सूर्यकांत लवटे, तसेच माजी महापौर ॲड. यतीन वाघ यांच्या पत्नी हितेश वाघ यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.