नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका आयुक्तांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता मूळ अंदाजपत्रकासोबत सादर केलेल्या वृक्षप्राधिकरणाचे २५ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीने कोणताही बदल न करता 'जैसे थे' महासभेला सादर केले. यात नवीन वृक्षलागवड व वृक्ष संवर्धनाकरिता तब्बल १२.१० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
महापालिकेच्या ३०११.८५ कोटींच्या मूळ अंदाजपत्रकात ४५७ कोटींची वाढ करत महापालिकेचे ३४६९ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीने महासभेला सादर केले. यात घरपट्टी, पाणीपट्टी, नगररचनासह विविध स्रोतांतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या बाजूत वाढ करत स्थायी समितीने नगरसेवकांना प्रभाग विकासासाठी ३१४ कोटी रुपये उपलब्ध करून दिले.
सत्तारूढ पक्षातील नगरसेवकांना या निधीतील मोठा वाटा मिळाला तर विरोधी गटातील नगरसेवकांना कमी विकासनिधी मिळाल्याने निधीवाटपात दुजाभाव केल्याचा आरोप करत विरोधकांनी महासभेत गोंधळ घातला. तब्बल सात तास रंगलेल्या चर्चेअंती महापौरांनी अंदाजपत्रक दुरुस्ती व उपसूचनांसह मंजूर करण्यात येत असल्याचे जाहीर केले. या अंदाजपत्रकासोबतच वृक्षप्राधिकरण समितीचे अंदाजपत्रकही महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले होते.
आयुक्तांनी वृक्षप्राधिकरणासाठी सादर केलेल्या २५ कोटींच्या अंदाजपत्रकात कुठलीही वाढ न सूचविता स्थायी समितीने हे अंदाजपत्रक महासभेच्या मान्यतेसाठी सादर केले होते. त्यासही महासभेने मंजुरी दिली आहे.
सिंहस्थ कामांसाठी २.२२ कोटी
मूळ अंदाजपत्रकावर सिंहस्थ कामांची छाप असताना वृक्षप्राधिकरणाच्या अंदाजपत्रकातही सिंहस्थविषयक तसेच नावीन्यपूर्ण कामांसाठी २.२२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जमा बाजूतील खर्च दर्शविताना सुरुवातीची १३.६६ कोटींच्या शिलकेसह वृक्षनिधी परताव्यापोटी ५.०६ कोटी, वृक्षनिधी परताव्यापोटी २.७५ कोटी, वृक्षसंवर्धन करापोटी ३.५६ कोटींचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे.