

हरसूल : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरी येथे जमिनीच्या वादातून सोनू राथड या पुतण्याने आपल्या सख्ख्या काकावर कुऱ्हाडीने सपासप वार करून त्यांची निघृण हत्या केली. या हल्ल्यात मृताचा धाकटा भाऊ गंभीर जखमी झाला आहे.
जमिनीच्या तुकड्यासाठी काकांचा बळी घेणाऱ्या या पुतण्याच्या कृत्यामुळे संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त होत आहे. देवडोंगरीपैकी गौळपाडा येथे पांडू खंडू राथड आणि त्यांचा पुतण्या सोनू धाकलू राथड (रा. गौळपाडा) यांच्यात अनेक वर्षांपासून शेतजमिनीवरून वाद होता. शुक्रवारी सायं. ४ च्या सुमारास पांडू राथड शेतात असताना संशयित सोनू राथडने कुऱ्हाड घेऊन येत पांडूवर हल्ला चढवला.
यावेळी पतीस वाचवण्यासाठी हिराबाई राथडने आरडाओरडा केला. भावाला वाचवण्यासाठी ७० वर्षीय रामा राथड हे आले असता त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा प्रहार केला. यात रामा खंडू राथड (७०) यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी पांडू राथड यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हरसूल पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बोरसे, वासुदेव देसले आदींनी घटनास्थळी धाव घेत संशयित सोनू राथड यास ताब्यात घेतले.