Nashik MNS | मनसेच्या पराग शिंत्रेना मिसळ पार्टी भोवली; सदस्यत्वाचा राजीनामा, काय आहे प्रकरण?

Nashik MNS | मनसेच्या पराग शिंत्रेना मिसळ पार्टी भोवली; सदस्यत्वाचा राजीनामा, काय आहे प्रकरण?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मिसळ पार्टी प्रकरणी शिस्तभंगाची कारवाई केलेले मनसेचे प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे यांनी अखेर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मिसळ पार्टीच्यानिमित्ताने मनसेत लक्ष्मीदर्शनाची खदखद समोर आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार कॅमेराबद्ध करून त्याबाबतचा पेनड्राइव्ह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या हालचाली समोर आल्यानंतर शिंत्रे यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई म्हणून सर्व पदमुक्त केले होते.

पक्षाचे सरचिटणीस अॅड. गणेश सातपूते व किशोर शिंदे यांनी पक्षाच्या वतीने काढलेल्या पत्रात शिंत्रे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्यांना पदमुक्त केले होते. या संपूर्ण प्रकारामुळे मनसेत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा नव्याने रंगली होती. दरम्यान, शिस्तभंगाची कारवाई झाल्याच्या काही दिवसातच शिंत्रे यांनी आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबत राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले की, 'मी पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात कोणतेही काम केलेले नाही. तसा विचारही मी करू शकत नाही. मी पक्षाविरोधात मीडियात बोललो नाही. काही लोकांनी ही बाब खोडसाळपणे मांडली. मात्र, माझी भूमिका मांडण्यात मला संधी गेली नसल्याचे दुख आहे. गेल्या ३ जून रोजी मिळालेले पत्र व त्या माध्यमातून मला प्रदेश उपाध्यक्ष या पदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्याचा आपला आदेश मनापासून स्वीकारला आहे. मी आजही आपल्यावरील विश्वासावर, माझ्या विचारांवर, बोलण्यावर ठाम आहे. त्यात बदल करणार नाही. आपल्या सोबतचा राजकीय प्रवास कदाचित इथंपर्यंतच असावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, कार्यकर्त्यांसाठी आयोजित मिसळ पार्टीत पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांविरोधात कार्यकर्त्यांनी उघड नाराजीचा सूर आवळला होता. कार्यकर्त्यांच्या या भावना आॅन कॅमेरा रेकॉर्ड करण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी पदरमोड करून प्रचार केला. परंतु स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वाऱ्यावर सोडल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली. एवढेच नव्हे तर कॅमेरासमोर कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गत बाबी विषद केल्या. मनसेच्या स्थापनेपासून प्रथमच कार्यकर्त्यांनी पक्षामधील पदाधिकाऱ्यांविषयी नाराजीचा सूर आवळल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिंत्रे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती.

मनसेत खदखद टोकाला

मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील खदखद आता टोकला पोहोचल्याचे शिंत्रे यांच्या राजीनाम्यावरून समोर आले आहे. शिंत्रे यांनी आपल्या राजीनाम्यामध्ये देखील 'काही लोकांनी खोडसाळपणे' असा उल्लेख केला आहे. त्यांचा रोष स्थानिक पदाधिकाऱ्यांवर होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे मनसेतील खदखद टोकाला गेल्याची सध्या चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मनसेतील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.

हेही  वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news