

नाशिक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नाशिक कार्यालयात आता उद्योजकांच्या मदतीसाठी 'हेल्प डेस्क' कार्यान्वित करण्यात आला आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधत हेल्प डेस्कचे उद्घाटन निमा अध्यक्ष आशिष नहार यांच्या हस्ते करण्यात आले.
एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम असून, विविध कामांसाठी येणाऱ्या उद्योजकांना त्यांच्या फाईलींची व कामांची माहिती सहजपणे मिळावी, या उद्देशाने हा डेस्क कार्यरत करण्यात आला आहे.
सातपूर आयटीआय सिग्नल शेजारी असलेल्या उद्योग भवनातील एमआयडीसी कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रसंगी आयमा अध्यक्ष ललित बुब, राजेंद्र पानसरे, गोविंद झा, प्रदीप पेशकार, राजेंद्र अहिरे, मनीष रावल, राजेंद्र वडनेरे आदींसह एमआयडीसी अधिकारी उपस्थित होते. यावेळी वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या स्पर्धकांचा व इयत्ता दहावी-बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एमआयडीसी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एमआयडीसीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
पदभार स्वीकारल्यानंतर केवळ सहा महिन्यांत प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांनी उद्योजकांशी सुसंवाद वाढवून औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीचे वातावरण तयार केले आहे. शुक्रवारी (दि.१) सकाळी आयोजित सत्यनारायण पूजेप्रसंगी अनेक उद्योजकांनी पाटील यांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक करत, त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.