

नाशिक : दररोज वापरात येणाऱ्या पाण्यामधील ४८ टक्के सांडपाणीच प्रक्रिया करून नदी पात्रात सोडले जाते. उर्वरित ५२ टक्के सांडपाणी विनाप्रक्रिया नदिपात्रात सोडले जात असल्याची धक्कादायक माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. हा गंभीर विषय असून, लवकरात लवकर एसटीपी प्रकल्पांचे कामे पूर्ण व्हावेत, यासाठी मी आग्रही असल्याचेही त्या म्हणाल्या.
क्रेडाई नाशिक मेट्रोच्या 'एअरोनॉमिक्स २०२५' या नावीन्यपूर्ण मोहिमेच्या प्रारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल आहेर, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर, माजी अध्यक्ष कृणाल पाटील, सचिव तुषार संकलेचा, समन्वयक उदय घुगे आदी उपस्थित होते.
मंत्री मुंडे म्हणाल्या, ध्वनी, वायू असो वा जल प्रदूषण हा गंभीर विषय आहे. आगामी गणेशोत्सवात गणरायाचे विसर्जन कसे करायचे हा प्रश्न पडतो. खरं तर प्रत्येक धर्माने 'धार्मिक प्रदूषण' होणार नाही, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नदी पूर्नजीवन योजनेअंतर्गत नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. एसटीपी प्रकल्प रेंगाळत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे धोरण अवलंबविले जाणार आहे. याशिवाय मोठे बांधकाम प्रकल्प, रस्ते, टनेल्सच्या कामांमधून धुळीच्या होत असलेल्या धुराळ्यामुळे हवेची गुणवत्ता घसरत आहे. त्यामुळे प्रत्येक बांधकाम व्यावसायिकांनी एसटीपीचे पालन करणे, प्री कास्ट मटेरियलचा वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंगने पाण्याचे नियोजन, हिरवळीसह इको फ्रेंडली इमारत उभारण्यास प्राधान्य द्यायला हवे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी शहराच्या हवेची गुणवत्ता आणि अर्थकारण यावर आणि कचरा नियोजनाबाबतच्या दोन श्वेतपत्रिकांचे प्रकाशन करण्यात आले. 'एअरोनॉमिक्स २०२५' या मोहिमेत शहरातील तब्बल १८ संघटना सहभागी झाल्या असून, या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थितांना पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली. प्रास्ताविक गौरव ठक्कर यांनी केले. आभार तुषार संकलेचा यांनी मानले.
नदी पूर्नजीवन योजनेत जास्त ताकदीने काम करण्याची गरज आहे. त्यासाठी ग्रामविकास, नगरविकास, जलसंपदा आणि या खात्याच्या विविध विभागांमध्ये समन्वयाची आणि त्यांना एकत्र बांधण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही एक योजना तयार केली असून, मुख्यमंत्र्यांच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यावर काम केले जाईल. या योजनेअंतर्गत राज्यातील नद्यांसाठी पुढील १५ वर्षांचे प्लॅनिंग करण्यात आले असून, यातून नद्या पूर्नजीवित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सफाई कर्मचाऱ्यांना जीवाची पर्वा न करता शहर स्वच्छतेसाठी कामे करावी लागतात. मात्र, पुढील काळात रोबोटीक्स तसेच 'एआय' तंत्रज्ञानाचा स्वच्छता तसेच पर्यावरण रक्षणासाठी वापर केला जाणार असल्याचेही मंत्री मुंडे म्हणाल्या.
कार्यक्रमात क्रेडाई नाशिक मेट्रोने श्रीजी ग्रुपतर्फे ५० हजार वृक्ष लागवडीचा एमओयू केला. राह फाउंडेशनच्या माध्यमातूनही वृक्ष लागवड केली जात असल्याचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी स्पष्ट केले. तसेच 'एअरोनॉमिक्स' ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाच्या सहभागाची गरज असल्याचेही ठक्कर यांनी स्पष्ट केले.