

नाशिक : दिवाळीचा सण आणि लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त साधण्यासाठी नाशिकच्या बाजारपेठेत उत्साहाला उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या खरेदीच्या गर्दीने आता उच्चांक गाठला आहे. रविवारी (दि. ८) लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होण्याची चिन्हे आहेत. सोने-चांदीचे दागिने, सदनिका, भूखंड, चारचाकी-दुचाकी वाहने, कपडे, गृहोपयोगी उपकरणे आणि मोबाइलची मोठ्या प्रमाणात खरेदीची अपेक्षा आहे. बाजारकल आणि व्यावसायिकांच्या अंदाजानुसार, लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शहरात ५०० ते ५५० कोटी रुपयांच्या उलाढालीची शक्यता आहे.
गेल्यावर्षी धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दोन दिवसांत नाशिकमध्ये १४०० चारचाकी, सात हजार दुचार्कीची विक्री झाल्याचा अंदाज होता. चारचाकी वाहनांची १४० कोटी, दुचाकींची ७० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. याच दोन दिवसांत १०० कोटी रुपयांच्या २०० सदनिकांचे व्यवहार झाल्याचा अंदाज क्रेडाईकडून व्यक्त करण्यात आला होता. यंदाही वाहन आणि बांधकाम क्षेत्रात मुहूर्ताच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या वाढलेल्या दरांमुळे खरेदीचे स्वरूप बदलले असले, तरी ग्राहकांचा उत्साह कायम आहे.
कमी वजनाचे दागिने, सोने चांदीची नाणी, पूजेच्या वस्तू आणि पारंपरिक दागिन्यांना मागणी आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही सोने-चांदी खरेदीकडे पाहिले जात आहे. दुसरीकडे, दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन घर घेण्याची परंपरा जपत अनेकांनी सदनिका आणि भूखंडांच्या व्यवहारांना पसंती दिली आहे. कापड बाजारातही दिवाळीचा उत्साह दिसत आहे. नवीन कपडे, साडी, तयार कपडे, लहान मुलांचे कपडे आणि ब्रँडेड वस्त्रांची खरेदी सुरू आहे.
हप्त्यांच्या योजनांमुळे खरेदीला बळ
बोनस, सानुग्रह अनुदान, आकर्षक सवलती आणि सुलभ हप्त्यांच्या योजनांमुळे खरेदीला आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त व्यापाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या भरभराटीचा ठरण्याची चिन्हे आहेत.