

नाशिक : मराठी बालरंगभूमी परिषदेने मराठी बाल रंगभूमी परिषदेने मराठी बालनाट्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेऊन अनेक बालकलाकारांना नवीन ऊर्जा दिली आहे. नाटकात काम करताना स्वत:चा शोध घेता आला. जगण्याचा आत्मविश्वास दिला, अशा भावना बालपणीपासून नाटकात काम करणाऱ्या कलाकरांनी 'पुढारी' शी बोलताना व्यक्त केल्या.
नाशिकची सई आदिती तुषार हीने वयाच्या तिसऱ्या वर्षी बाल रंगभूमीवर पाऊल टाकले.'छुम छुम खडा', 'पंखातील आभाळ', 'सपान', 'मला मोठं व्हायचंय', 'टरगु टरगु' या स्पर्धेच्या नाटकांबरोबरच 'संध्या छाया', 'श्यामची आई' यासारख्या व्यावसायिक नाटकांतही सईने चोख भूमिका बजावल्या. रंगभूमीवर अभिनयापुरती मर्यादित न राहता वयाच्या चौदाव्या वर्षी महाराष्ट्रातील पहिली बाल दिग्दर्शिका म्हणून तिने नाव कमावले. आज ती दूरचित्रवाणी मालिकात अभिनय करत आहे.
वयाच्या आठव्या वर्षी 'शामची आई' या नाटकापासून अभिनयाला सुरुवात करणाऱ्या मंगेश परमारने मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून प्रयोग केले. आजवर त्याने चारशेहून अधिक नाटकात तसेच चित्रपट, लघुपटात भूमिका साकारल्या. बालरंगभूमीपासून अभिनय, तंत्रज्ञ म्हणून काम करणारे असे अनेक बालकलाकार आज मराठी, सिनमा, मालिका, जाहिरातपटात काम करण्याची संधी मिळाली. आज तो केंद्रिय संस्कृत विश्वविद्यालयात नोकरी करत आहे.
देशात मराठी बालरंगभूमीची समृध्द परंपरा असून, मराठी बालनाट्यालाही ६६ वर्षांची समृध्द परंपरा आहे. मराठी बालनाट्यांचे सर्वाधिक प्रयोग महाराष्ट्रात होतात. २ ऑगस्ट १९५९ रोजी पहिल्या व्यावसायिक बालनाट्याचा प्रयोग झाला. म्हणून बालरंगभूमी परिषदेतर्फे दर वर्षी २ ऑगस्ट हा 'मराठी बालनाट्य दिवस' म्हणून साजरा केला जातो.
'नकळत्या वयात सुरु झालेल्या या प्रवासात बालरंगभूमीने बोलण्याची कला, आत्मविश्वास दिला. एक नवी ओळख तर दिलीच पण माझ्यातली मी नव्याने समजून घेण्याच्या अनेक संधी दिल्या. पालकांनी आपल्या मुलांना बालपणापासून नाटकाची आवड लावावी. त्यासाठी बालनाटकांना पाठववावे.
सई आदिती तुषार, नाटय कलाकार
बाल नाटकाने स्वत:शी नव्याने ओळख झाली. आत्मविश्वास निर्माण केला. अंतमुर्ख स्वभाग बदलला आणि अभिनयासह नाटकाचे तांत्रिक बाजू शिकलो. जीवनात यशस्वी होण्यासाठी लागणारे सर्व कौशल्य, उर्जा नाटकांनीच दिला.
मंगेश परमार, नाटय कलाकार.
कुठल्याही चळवळीचा पाया भक्कम असेल तर ती दिर्घायु होते. रंगमंचीय आविष्कारांची गोडी लहानपणापासून लागण्याची गरज आहे. बाल कलाकार, बाल प्रेक्षक तयार झाले तरच भविष्यात नाट्यकला जीवंत राहील. बालरंगभूमी परिषदेने काळाची पावले ओळखून मुळापासून काम सुरू केले आहे.
डॉ . आदिती मोराणकर, अध्यक्षा, बालरंगभूमी परिषद नाशिक शाखा.