

मुंबई : राजेश सावंत
महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईमध्ये मराठी भाषेचे महत्त्व वाढवण्यासाठी मराठी चित्रपट व नाटकांना रंगभूमी कर माफ करण्यात आला आहे. पण राज्याच्या याच राजधानीत गुजराती चित्रपट व नाटकांनाही रंगभूमी करातून माफी देण्यात येते. गेल्या कित्येक वर्षापासून राज्य सरकारच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेकडून ही माफी देण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईत मराठीइतकेच गुजराती भाषेला महत्त्व असल्याचे दिसून येते.
काही दिवसांपूर्वी गुजरात बॉर्डरच्या महाराष्ट्र हद्दीत गुजराती भाषेत लिहिलेले फलक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकले. यावेळी मनसैनिकांनी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचाच वापर करा, असे ठणकावूनही सांगितले होते. पण महाराष्ट्राच्या राजधानीतच गुजराती भाषेचे चोचले पुरवले जात आहेत.
मुंबई महापालिका गुजराती माध्यमाच्या शाळाही चालवते. एवढेच काय तर, मुंबईत गुजराती भाषेचे महत्व वाढवण्यासाठी गुजराती भाषेतील चित्रपट व नाटक मुंबई शहरात व्हावेत यासाठी त्यांना रंगभूमीकरांमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून माफी देण्यात येत आहे. त्यामुळे गुजराती भाषेच्या वाढीसाठी महाराष्ट्राच्या राजधानीचा कारभार सांभाळणार्या मुंबई महापालिकेने आपले नुकसान का करावे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मुंबई शहर व उपनगरातील एसी चित्रपटगृहांमध्ये मराठी व गुजराती भाषिक चित्रपट वगळता अन्य भाषिक चित्रपटासाठी प्रती खेळ 60 रुपये, नॉनएसी चित्रपटगृहासाठी प्रती खेळ 45 रुपये, नाटक व अन्य करमणुकीच्या कार्यक्रमासाठी प्रती खेळ 25 रुपये, सर्कस, आनंद मेळा प्रती दिन 50 रुपये, अन्य करमणुकीसाठी प्रती खेळ 30 रुपये आकारले जातात.
या करामध्ये 2026-27 या आर्थिक वर्षात वाढ करण्यासाठी मुंबई महापालिकेने राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावातही गुजराती चित्रपट व नाटकांना रंगभूमी करमाफी देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजधानीत अनेक भाषिक चित्रपट व नाटके होतात. मग केवळ गुजराती भाषेचे चोचले का, असा सवाल आता मुंबईकर करू लागले आहेत.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. येथे गुजराती भाषेच्या चित्रपट व नाटकांना रंगभूमी करमाफी हवी कशाला, आतापर्यंत कर माफी दिली असेल पण यापुढे गुजराती भाषेच्या चित्रपट व नाटकांना करमाफीतून वगळण्यात यावे. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल, असा इशारा मनसेचे विभागप्रमुख संतोष धुरी यांनी दिला आहे.