

नाशिक : निल कुलकर्णी
रंगमंचीय अवकाशाचा पुरेपुर आणि यथायोग्य वापर करुन कायिक, वाचिक, अभिनय, नृत्य, नाट्य, संगीत, चित्र, रेषा, या माध्यमातून संवाद साधणे, संदेश देणे, शिक्षित करणे अन् रंजन करणे, असे अनेक कलाप्रकार रंगभूमीवर सादर होत असतात.
‘रंगमंच’ शब्दाची व्याप्ती केवळ नाट्यप्रयोग इतकाच सिमीत न रहाता ते विविध पद्धतीने मंचावर अविष्कृत होत जातात. या व्यापक कलांना ‘रंगमंचीय कला’ म्हणूनच गणले जाते. नाशिकमधील जयेश बोरसे अशीच एक मंचीय कला ‘सॅण्ट आर्ट’ला अविष्कृत करत आहेत. भारतात असे मोजकेच कलावंत असून जयेश नाशिकमधील एकमेव कलावंत आहेत.
पारंपरिक रंगभूमी वा ‘थिएटर’ची संकल्पना काळानुरुप अधिक व्यापक होत आहे. ‘परफॉर्मिंग आर्ट’ म्हणजे मंचीय अविष्कृत कला आणि ‘आर्ट फरफॉर्म’ म्हणजे ‘कला अविष्करण’ होय. आर्ट परफॉर्ममध्ये मोनालिसा मेहर या भारतीय महिलेने जागतिक यश मिळवले. कला अविष्करणात कलाकार स्वत: कलेचा एक भाग, पात्र होऊन रंग रेषा, साहित्यातून कलेचे सादरीकरण करत असतो. त्यासाठी प्रत्येक वेळी ‘मंच’ लागेलच असे नव्हे तर सार्वजनिक जागा, मैदाने, चौक आदी ठिकाणी कलाकार कलाविष्करण करतो.
'सॅण्ड आर्टीस्ट' जयेश बोरसे वाळु, प्रकाश, संगीत, ध्वनी, संवाद यांचा वापर करुन चलत्चित्रे काचेवर सादर करून त्याचे मंचीय अविष्करण करतात. त्यात ते स्वत: कलावंत म्हणून एकपात्री प्रयोग सादर करतात. यामध्ये निवेदन, व्हाईसओहर, संगीत वापरुन मंचीय कलाविष्कार सादर होतो. भारतात मोजकेच 'सॅण्ड आर्टीस्ट' त्यात बोरसे हेही गणले जातात. या एकपात्री अविष्कारातून नाटक, कथा फुलवली जाते आणि ती बहुविध माध्यमातून दाखवत साधण्यासह जनसंवादाची, रंजनाची ‘रंग’ मंचीय उद्दिष्टे सहज साध्य होताना दिसत आहे. असे नवे मंचीय अविष्कार जनसंवादाची प्रभावी माध्यमे म्हणून समाेर येत आहेत.
सॅण्ड आर्ट हे वालुका चित्रांव्दारे सादर होणारी दृकश्राव्य अभिव्यक्ती असून ती एकच आर्टीस्ट सादर करतो. यामध्ये रुपेरी वाळु वापरुन व्यक्तीचित्रे तयार केली जातात. त्यांना चलत् करुन नाट्यरुपात कथा सादर होते. वाळूकणांवरील प्रतिमा तयार करुन त्याचे खाली प्रकाशझोत सोडला जातो. वरती कॅमेरा लाऊन एक सुरेख चित्रकथा वाळु पात्रांव्दारे प्रेक्षकांसमोर सादर होते. हा कलाविष्कार ‘लाईव्ह’ असून नाटकांप्रमाणेच त्यालाही प्रेक्षकांचा तत्काळ प्रतिसाद, दाद मिळते.
विदेशात शास्त्रज्ञांचे प्रयोग सुरू असताना अपघाताने या कलेचा जन्म झाला. प्रयोगादरम्यान काचेवर वाळू पडल्याने त्याखालील प्रकाश वाळूवर पडून अचानाक चलती व्यक्तीचित्रे शास्त्रज्ञांना दिसली. नंतर या चलत्चित्रांना संवाद, ध्वनी, संगीत आदिंची जोड देऊन 'सॅण्ड आर्ट'चा जन्म झाला. महापुरुषांची चरित्र्ये, यशोगाथा, असामान्य व्यक्तीचा प्रवास, जनहितार्थ प्रचारण, संदेश यातून प्रभावीपणे सादर होऊ शकतात.
जयेश बाेरसे, सॅण्ड आर्टीस्ट, नाशिक.