Nashik Fraud | सोन्याचे बनावट नाणे देऊन वृद्धाची ५ लाखांची फसवणूक; तिघींना मनमाडमधून अटक

कळवण, देवळा, चांदवडमार्गे आरोपींचा माग काढला; पाच लाखांची रोकड आणि ६०० ग्रॅम बनावट नाणी हस्तगत
Fake Gold Coin Fraud Vani Nashik
फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन महिलांना वणी पोलिसांनी मनमाड येथून अटक केली Pudhari
Published on: 
Updated on: 

Fake Gold Coin Fraud Vani Nashik

वणी : सोन्याची नाणी असल्याचे भासवून पिवळ्या धातूची बनावट नाणी देत ६८ वर्षीय व्यक्तीची पाच लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन महिलांना वणी पोलिसांनी मनमाड येथून अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून फसवणुकीची पाच लाख रुपयांची संपूर्ण रोकड आणि सुमारे ६०० ग्रॅम वजनाची बनावट नाणी हस्तगत केली आहेत.

घटना घडल्यानंतर आरोपी वाहनातून वणीहून कळवणच्या दिशेने पसार झाले होते. मात्र, वाहनचालकाची चौकशी, सीसीटीव्ही फुटेज आणि विविध ठिकाणी केलेल्या तपासाच्या आधारे पोलिसांनी कळवण, देवळा, चांदवडमार्गे मनमाडपर्यंत आरोपींचा माग काढत त्यांना जेरबंद केले.

कसबे वणी येथील शिंपी गल्ली परिसरात राहणारे दिलीप परशराम मोर (६८) हे शिवणकामाचा व्यवसाय करतात. २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास ते कृपा हॉस्पिटलजवळील त्यांच्या घरी असताना आरोपी त्यांच्या संपर्कात आले. आरोपींनी संगनमत करून कापडी पिशवीतील काही नाणी सोन्याची असल्याचे भासविले. नाणी सोन्याची असल्याचा विश्वास निर्माण करून आरोपींनी मोर यांच्याकडून त्यापोटी पाच लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर त्यांच्या हातात पिवळ्या धातूची बनावट नाणी देऊन आरोपी तेथून पसार झाले.

Fake Gold Coin Fraud Vani Nashik
Nashik Crime News | कापडणीस पिता-पुत्र दुहेरी हत्याकांड खटल्याला वेग! तपासी अंमलदाराची न्यायालयात महत्त्वाची साक्ष

काही वेळानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोर यांनी वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरविली.

वाहनचालकाच्या चौकशीत मिळाला महत्त्वाचा धागा

घटनेनंतर आरोपी कोणत्या वाहनातून पसार झाले, याची माहिती पोलिसांनी मिळविली. संबंधित वाहनचालकाची चौकशी केल्यानंतर आरोपींना वणीहून कळवणच्या दिशेने नेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. वाहनचालकाने आरोपींना कोणत्या ठिकाणी सोडले, याची माहितीही पोलिसांना दिली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. उपलब्ध माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजची सांगड घालत आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यास सुरुवात करण्यात आली.

Fake Gold Coin Fraud Vani Nashik
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिका विषय समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर! 8 आणि 9 ऑक्टोबरला रंगणार सभापतीपदाचा संग्राम

कळवणपासून मनमाडपर्यंत माग काढला

आरोपी कळवण परिसरातून पुढे गेल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी कळवण, देवळा, चांदवड आणि मनमाड परिसरात शोधमोहीम राबविली. विविध ठिकाणी चौकशी करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींच्या हालचालींचा माग घेत पोलिस पथक मनमाड शहरात पोहोचले.

अखेर मनमाडमध्ये आरोपींचा ठावठिकाणा निश्चित करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर कारवाई करून तेजलवेन आनंदबाई वाघीरी (३५), वाघीरी श्रद्धावेन धिरुबाई (७३) आणि रेखाबेन अनिलभाई वाघीरी (३४), तिघीही रा. वडोदरा, गुजरात, यांना ताब्यात घेण्यात आले.

पाच लाखांची रोकड, ६०० ग्रॅम बनावट नाणी जप्त

पोलिसांनी आरोपींकडून फसवणुकीत घेतलेली पाच लाख रुपयांची संपूर्ण रोकड हस्तगत केली. तसेच सुमारे ६०० ग्रॅम वजनाची पिवळ्या धातूची बनावट नाणीही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी पप्पुभाई दुग्लभाई सोवासीया (रा. वडोदरा, गुजरात) याचा शोध सुरू आहे.

Fake Gold Coin Fraud Vani Nashik
Nashik Swine Flu Cases| नाशिकमध्ये गणेशोत्सवानंतर स्वाइन फ्लूचा कहर! रुग्णसंख्या 318 वर, महिनाभरात 171 बाधित

हेमंत फड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास

वणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत फड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संतोष कडाळे, पोलिस हवालदार मज्जु देशमुख आणि नितीन तेलंगे यांनी वाहनचालकाची चौकशी, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि विविध ठिकाणी राबविलेल्या शोधमोहीमेमुळे आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यात आला. कळवणपासून देवळा, चांदवड आणि पुढे मनमाडपर्यंत तपासाची साखळी जोडत पोलिसांनी अखेर तीन महिलांना ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news