

मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी येथील ग्रामदैवत श्री साटया बावा मंदिरातील विटंबनेच्या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. काही अज्ञात व्यक्तींनी मंदिरात प्रवेश करून देवतेची विटंबना केल्याचा आरोप करीत सकल हिंदू समाज तसेच ग्रामस्थांनी तीव्र निषेध नोंदविला आहे. या घटनेमुळे धार्मिक भावना दुखाविल्या गेल्याचा आरोप करीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
या पाश्र्श्वभूमीवर साठ्या बाबा मंदिर परिसरात गुरुवारी (दि. २३) जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सकल हिंदू समाज, विविध संघटना आणि चंदनपुरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुमारे दोन ते तीन तास सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार विशाल सोनवणे व पोलिस उपअधीक्षक दर्शन दुगड यांनी निवेदन स्वीकारले, आंदोलकांनी दिलेल्या निवेदनाव आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेनुसार कठोर कलमे लावावीत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच चंदनपुरी गावाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन गावात कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारावी, अशी मागणीही करण्यात आली.
याशिवाय यात्रोत्सव काळात गावातील शांतता अबाधित राखण्यासाठी बाहेरील व्यावसायिकांवर निर्बंध घालण्याबाबत विशेष ठराव करावा तसेच गावाच्या परंपरा व धार्मिक ओळख जपण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन मिव्यल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी सतर्कता वाढविली आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाने केली आरोपींच्या अटकेची मागणी
मालेगाव : पुढारी वृत्तसेवा चंदनपुरी येथील ग्रामदैवत श्री साट्या बाबा मंदिराच्या विटंबना प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांना निवेदन देण्यात आले. मंदिर विटंबनेची घटना अत्यंत संतापजनक असून, यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. काही दिवस उलटूनही मुख्य आरोपीवर ठोस कारवाई झालेली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तसेच मालेगाव परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या विलंबामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर दोषींना तावडीने अटक करावी, प्रकरणाचा जलद तपास करून सूत्रधारांचा शोध घ्यावा तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी भरत पाटील, निखिल पवार, दिलीप पाटील, अनिल जाधव, मयूर वांद्रे, डॉ. धीरेंद्र चव्हाण, रमेश वाणी, राकेश पाटील आदी उपस्थित होते.