

नाशिक : नाशिक महापालिकेत १०० प्लसचा नारा वास्तवात उतरविण्यासाठी भाजपने सर्वच विरोधी पक्षातील दिग्गजांना गळाला लावले असताना सर्व छोट्या पक्षांची मोट बांधून भाजपला आव्हान देऊ पाहणारी महाविकास आघाडी जागा वाटपावरून एकमत न झाल्यामुळे दुभंगली आहे. शिवसेना (उबाठा) व मनसेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला प्रत्येकी सात पेक्षा अधिक जागा देण्यास नकार दिल्याने या आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका काँग्रेस, राष्ट्रवादीने घेतली असून माकप, वंचितला बरोबर घेऊन नवी विकास आघाडी तयार करण्याची तयारी केली आहे.
नाशिक महापालिकेतीची रणधुमाळी आता जोमात आली आहे. सर्वच पक्षातील दिग्गजांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन आव्हान उभे करणाऱ्या भाजपला धडा शिकविण्यासाठी शिवसेना(उबाठा), मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह वंचित, रासपची मोट बांधण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होता. परंतु, या आघाडीचे समन्वयक म्हणून भूमिका पार पाडणाऱ्या दिनकर पाटील, माजी महापौर विनायक पांडे, अॅड. यतीन वाघ, शाहू खैरे यांना भाजपने आपल्या गळाला लावल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला. त्या धक्कातून सावरत महाविकास आघाडी अखंड ठेवण्याच्या आणाभाका महाविकास आघाडीतील शिल्लक पदाधिकाऱ्यांनी घेतल्या खऱ्या, परंतु जागावाटपावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा शनिवारी(दि.२७) अपयशी ठरली.
शालिमार येथील उबाठाच्या मध्यवर्ती कार्यालयात महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बैठक पार पडली. या बैठकीत उबाठाकडून उपनेते दत्ता गायकवाड, माजी महापौर वसंत गिते, जिल्हाप्रमुख डी.जी. सुर्यवंशी, खा. राजाभाऊ वाजे, मनसेकडून प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शहराध्यक्ष गजानन शेलार, काँग्रेसकडून शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड आदी उपस्थित होते. काही जागांवर वाद असल्याने या बैठकीत एकेक जागावर उमेदवारनिहाय चर्चा झाली. उबाठा-मनसेने काँग्रेस-राष्ट्रवादी समोर प्रत्येकी सात जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला. यापेक्षा अधिक जागा मिळाव्यात अशी काँग्रेस, राष्ट्रवादीची मागणी होती. परंतु उमेदवारनिहाय चर्चा करताना ही जागा मिळणार नाही, त्या जागेवर आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे, असे उबाठा-मनसेकडून सांगण्यात आल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते संतप्त झाले. त्यांनी जागा वाटप अमान्य असल्याचे सांगत बैठकीतून काढता पाय घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा फिस्कटली.
तीन प्रभागांवरून वाद
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले जात होते. परंतु काही जागांबाबत वाद असल्याने आघाडीच्या बैठकीत पुन्हा प्रभाग १ वरून उमेदवारनिहाय चर्चा सुरू झाली. यात प्रभाग एक, सहा व दहा या तीन प्रभागांतील जागांवरून उबाठा आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे एकमत होऊ शकले नाही. उबाठा व मनसेच्या नेत्यांनी या जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रस्ताव काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर ठेवला. यावर मैत्रीपूर्ण लढतच करायची होती, तर आघाडीही कशाला करता, असे सांगत काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते बैठकीतून बाहेर पडले.
तर उबाठा, मनसे जागा वाटून घेणार
महाविकास आघाडीच्या चर्चेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक दिवस वाट पाहिली जाणार आहे. वाद असलेल्या जागेवर चर्चेतून तोडगा काढला जाईल. त्यानंतरही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रतिसाद न आल्यास काँग्रेस, राष्ट्रवादीला दिल्या जाणाऱ्या जागा उबाठा, मनसेत वाटून घेतल्या जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचे गठण आवश्यक आहे. त्यादृष्टीने चर्चा सुरू असताना काही जागांवर मतभेद असल्याचे दिसले. त्याठिकाणी मैत्रीपुर्ण लढतीचा पर्याय आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीशी पुन्हा चर्चा करून तोडगा काढू.
वसंत गिते, उबाठा नेते.
भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकजूट दाखविणे आवश्यक आहे. त्यासाठी मनसेचे प्रयत्न सुरू आहेत. चर्चेतून तोडगा काढला जाईल. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची समजूत काढली जाईल.
सलीम शेख, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे.
नाशिक महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीद्वारे लढविण्याचे प्रयत्न आहेत. परंतु उबाठा आणि मनसेकडून राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा दिल्या गेल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेससह अन्य छोट्या पक्षांना बरोबर घेऊन नवीन आघाडीद्वारे निवडणूक लढविली जाईल.
गोकूळ पिंगळे, नेते, राष्ट्रवादी शरद पवार गट