नाशिक : आमच्याकडून जे गेले किंवा मनसेमधून जे गेले ते भटकेच आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे. गौतम अदानीसुद्धा भाजपचे सदस्य आहेत. इतरांचे आमदार खासदार नेते आपल्या पक्षात घेणे म्हणजे श्रीमंत भिकार्यांचे लक्षण असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मनसे-शिवसेना (उबाठा) युतीची घोषणा केली. त्यानंतर गुरुवारी (दि.25) भाजपने उबाठा व मनसेचे बडे नेते फोडत दोन्ही ठाकरे बंधूंना जबरदस्त धक्का दिला. धक्कादायक म्हणजे नाशिकचे मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. यावर मुंबईत संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. राऊत म्हणाले की, मंत्री गिरीश महाजन हे स्वतः ला बाहुबली समजतात. परंतु त्यांनादेखील नगरपालिकेत फटका बसला आहे. त्यांची पत्नी निवडून आली.
मात्र इतर कारणामुळे त्यांना फटका बसल्याचे राऊत यांनी सांगितले. भाजपात झालेल्या पक्ष प्रवेशानंतर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे रस्त्यावर उतरल्या. कोणालाही न जुमानता इतर पक्षच्या लोकांना सोबत घेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. आता हे मंत्री महाजन आपली गँग बनवत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. जे महाशय जात आहेत ते काल युती झाली म्हणून नाचत होते, पेढे भरवत होते आणि नाचता नाचता तिकडे गेले आणि त्यांनी ते घेतले. आता तिकडे जाणारे निर्लज्ज की घेणारे निर्लज्ज अशी जहरी टीका राऊत यांनी भाजपवर केली.