नाशिक : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी दिग्गजांच्या प्रवेश सोहळ्यावरून भाजपत बुधवारी (दि.२५) हायव्होल्टेज ड्रामा रंगला. गेली अनेक वर्षे राजकीय विरोधक असलेले शिवसेनेचे (उबाठा) प्रदेश संघटक तथा माजी महापौर विनायक पांडे, ॲड. यतीन वाघ, काँग्रेसचे माजी गटनेते शाहू खैरे यांच्या प्रवेशास भाजपच्या निवडणूक प्रमुख आ. देवयानी फरांदे यांच्यासह समथर्कांनी जोरदार विरोध केल्याने भाजपत निष्ठावंत विरुद्ध आयाराम असा संघर्ष बघायला मिळाला. विरोध डावलून प्रवेशसोहळा पार पडल्याने एकीकडे निष्ठावंतांनी दिलेल्या 'धिक्कारा'च्या घोषणा तर दुसरीकडे नव्या प्रवेशकर्त्यांच्या 'आगे बढो'च्या जयघोषाने 'वसंतस्मृती' कार्यालय दणाणून गेले.
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भाजपविरोधात एकीची मोट बांधणाऱ्या महाविकास आघाडीला भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी सुरुंग लावला. शाहू खैरे, विनायक पांडे व ॲड. यतीन वाघ या प्रभाग १३ मधून इच्छुक असलेल्या दिग्गजांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात असल्याने या प्रभागातून अनेक वर्षांपासून तयारी करणारे गणेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत प्रवेशाला विरोध केला. एकीकडे हे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे आ. फरांदे यांनी मंत्री महाजन यांची भेट घेत निवडणूक प्रमुख असूनही आपल्याला विश्वासात न घेता हा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आल्याची नाराजी व्यक्त केली. निष्ठावंतांवर अन्याय होऊ नये यासाठी प्रवेश थांबवण्याची विनंती त्यांनी केली. मात्र, महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. मागील निवडणूक ज्यांनी दहशतीने जिंकली. ज्यांनी भाजपच्या विचारधारेला नेहमीच विरोध केला त्यांनाच प्रवेश दिला जात असल्याची नाराजी गणेश मोरे व समर्थकांनी मांडली. यावेळी प्रवेशाला विरोध करणाऱ्यांनी 'धिक्कारा'च्या तर प्रवेश केलेल्यांच्या समर्थकांकडून 'आगे बढो'च्या घोषणा दिल्या गेल्याने वसंतस्मृती कार्यालय दणाणून गेले.
कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव
एकीकडे प्रवेश सोहळ्याला विरोध होत असताना खैरे, पांडे, वाघ यांचे एन. डी. पटेल रोडवरील भाजप कार्यालय परिसरात आगमन झाले. यावेळी एकीकडे विरोधक तर दुसरीकडे प्रवेशकर्त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांनी प्रवेशकर्त्यांच्या कार्यकर्त्यांना कार्यालयापासून १०० मीटर अंतरावरच रोखत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी भाजप कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला गेला. मंत्री महाजन कार्यालयाच्या प्रवेशद्वार आल्यानंतर विरोधकांनी त्यांना रोखत आपली भूमिका मांडली. यावेळी पोलिसांनी साखळी करत महाजनांना कार्यालयात नेले.
आमदार देवयानी फरांदे यांना अश्रू अनावर
पक्ष कार्यालयात आंदोलन सुरू असताना हॉटेल रेडिसन ब्ल्यू मध्ये आमदार देवयानी फरांदे यांनी मंत्री महाजन यांची भेट घेत प्रवेशावरून नाराजी व्यक्त केली. प्रवेश होणारच असल्याच्या भूमिकेवर महाजन ठाम राहिल्याने व्यथित झालेल्या फरांदे यांनी या प्रवेश सोहळ्यास उपस्थित न राहता थेट निवासस्थान गाठले. प्रवेश सोहळा आटोपल्यानंतर माध्यमांशी बोलताना भावूक झालेल्या देवयानी फरांदे यांना अश्रू अनावर झाले.
विरोधकांकडे आणखी कोणी उरले का
दिनकर पाटील यांना भाजपत प्रवेश दिल्यानंतर मंत्री महाजन यांनी त्यांची फिरकी घेतली. हा शेवटचा प्रवेश आता कुठेही जायचे नाही. इथेच राहून पक्षाचे काम करायचे, असे महाजन पाटील यांना उद्देशून म्हणाले. विरोधी पक्षातील बहुतेक सर्वच दिग्गजांनी भाजपत प्रवेश केला असल्याचे नमूद करत विरोधकांकडे आणखी कोणी उरले आहेत का, असेल तर सांगा, अशी उपरोधक टीकाही महाजन यांनी केली.