Nashik Lok Sabha Election 2024: परदेशातून येत बजावला मतदानाचा हक्क

Nashik Lok Sabha Election 2024: परदेशातून येत बजावला मतदानाचा हक्क

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा – लोकशाहीच्या उत्सवात तरुणांसापासून ज्येष्ठांपर्यंतच्या बहुतांश मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाही बळकटीकरणाला हातभार लावला. काही मतदारांनी तर परदेशातून मायदेशी येऊन नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदान केल्याचे बघायला मिळाले.

नाशिकच्या प्रियंका मनोहर बागूल (आहिरे) या पतीसह कतार या देशात राहतात. गेल्या चार ते पाच वर्षांपासून बागूल कुटुंबीयांचे तिथे वास्तव्य आहे. त्यांचे पती विमान कंपनीत नोकरी करतात. मात्र, मायदेशी सुरू असलेला लोकशाहीचा उत्सव अर्थात लोकसभा निवडणुकांचे मतदान त्यांच्या जणू कर्तव्याचाच भाग ठरला. प्रियंका काही दिवसांपूर्वी भारतात दाखल झाल्या. नाशिकच्या शिखरेवाडीतील मतदान केंद्रात त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आणि अधिकार तर आहेच. पण, ते कर्तव्यदेखील आहे. म्हणून आपण खास मतदानासाठी भारतात आल्याचे प्रियंका यांनी सांगितले. सिन्नरचे माजी उपनगराध्यक्ष विजय जाधव यांच्या त्या भाची आहेत. दरम्यान, मविप्र संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत यांच्या कुटुंबीयातील मयूर सदाशिव भगत हे अमेरिकेत नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. त्यांनीदेखील मतदानासाठी सिन्नर शहरात येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. देशाप्रती असलेल्या भावनेचे परिसरात कौतुक होत आहे. गतवर्षी श्रीप्रदा प्रशांत कोकाटे यांनी लंडनहून सिन्नर येत लोकनेते शं. वा. वाजे विद्यालयात मतदान केले होते. मूळचे खडांगळी येथील रहिवासी असलेले प्रशांत व त्यांच्या पत्नी श्रीपदा लंडनमध्ये नोकरीस आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news