नाशिक लोकसभा 2024 | पोलिसांचे फर्मान! माेबाइल मतदान केंद्राबाहेरच ठेवा

नाशिक : मतदान केंद्राबाहेर मोबाईल सांभाळतांना कर्मचारी. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक : मतदान केंद्राबाहेर मोबाईल सांभाळतांना कर्मचारी. (छाया : हेमंत घोरपडे)

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानावेळी मोबाइल मतदान केंद्राबाहेरच ठेवण्याचे फर्मान पोलिसांकडून सोडण्यात आले. ऐनवेळी घडलेल्या या प्रकारामुळे मतदारांचा चांगलाच गोंधळ उडाला.

राज्यात लोकसभेच्या पहिल्या चार टप्प्यांत झालेल्या मतदानावेळी मतदान केंद्रांच्या आत सेल्फी व मतदान करतानाचे व्हिडिओ काढण्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यानंतर मतदारांनी ही छायाचित्रे व व्हिडिओ थेट सोशल मीडियावर शेअर केली. हा प्रकार आचारसंहिताभंगाच्या कक्षात येतो. त्यामुळेच या घटना रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील पाचव्या व शेवटच्या टप्प्यातील १३ जागांसाठी घेतलेल्या मतदानावेळी केंद्रांमध्ये मोबाइल नेण्यावर बंदी घातली होती.

जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांतील मतदान केंद्राबाहेर तैनात असलेल्या पोलिसांनी मतदारांना केंद्रात मोबाइल नेण्यावर बंदी घातली होती. ऐनवेळी घडलेल्या या प्रकारामुळे मतदार गोंधळून गेले, तर काही मतदारांचे पोलिसांशी वाददेखील झाले. परंतु आयोगाचे निर्देश असल्याचे सांगत पोलिसांनी मोबाइल नेण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे कुटुंबातील एका व्यक्तीला मोबाइल सांभाळण्यासाठी केंद्राबाहेरच खडा पहारा द्यावा लागला. यावेळी मतदारांनी नाराजी व्यक्त करताना आयोगाचा हा निर्णय म्हणजे अतिरेक असल्याची भावना व्यक्त केली, तर मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्यानंतर त्याचे छायाचित्र मोबाइलमध्ये कैद करण्याच्या हेतूने आलेल्या युवा वर्गाचा हिरमोड झाला.

सेल्फी पाॅइंट नावालाच

मतदानाचा टक्का वाढावा, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाकडून गेल्या महिनाभरात अनेक प्रकारे जनजागृती करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट उभारण्यात आले. जेणेकरून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे छायाचित्र मोबाइलमध्ये कैद करून ते सोशल मीडियावर शेअर करावा, असा त्याचा उद्देश होता. पण बहुतेक ठिकाणी सेल्फी पाॅइंट हे केंद्राच्या आतील बाजूस उभारले होते. मुळातच मोबाइल आत नेण्यास परवानगी नसल्याने सेल्फी पाॅइंट नावापुरतेच उरले होते.

आमची जबाबदार नाही

मतदान केंद्रावर मतदानासाठी गेल्यानंतर बहुतेक नागरिकांना मोबाइलबंदीचा नियम माहिती झाला. त्यामुळे केंद्रावर तैनात पोलिस तसेच बीएलओंना नागरिक मतदानापुरता मोबाइल सांभाळण्याची विनंती करीत होते. पण ही आमची जबाबदारी नसल्याचे कर्मचाऱ्यांनी हात वर केले होते. त्यामुळे ऐनवेळी माेबाइल सांभाळण्यासाठी ओळखीची व्यक्ती शोधण्याची वेळ मतदारांवर ओढवली.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news