मखमलाबाद : मखमलाबाद परिसरातील गंधारवाडी तसेच पाटाजवळील काकड वस्ती परिसरात बिबट्या मादी आणि तिच्या तीन पुर्ण वाढलेल्या पिलांचा वावर असल्याने वनविभागाने खबरदारीचा उपाय म्हणून एफडीसीएम (वन विकास) या ठिकाणी रस्त्याला बांबूचे आवरण घालून रस्ता बंद वाहतुकीसाठी बंद केला आहे. बिबट्याचा सर्वाधिक संचार असलेल्या ठिकाणी वन विभागाने बाबूंचे अ़डथळे उभे केले आहे.
सध्या चार बिबट्यांचा संचार मखमलाबाद परिसरातील गंधारवाडी, पाटा जवळील काकड वस्तीजवळ आहे. रस्ताच्या बाजूला दाट शेती असल्याने तेथे बिबट्याला लपण्यासाठी जागा आहे. या रस्त्यावरुन जात असताना शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला यांच्यावर बिबट्याचे हल्ले होऊ शकतात. त्यामुळे एखाद्याचा जीव जाण्याच्या शक्यतेने वनविभागाने खबरदारीचा उपाय म्हणून रस्त्यात बांबू आडवे टाकून रस्ता बंद करुन टाकला आहे.
काकड वस्ती येथे पाटाजवळ बिबट्यासाठी पिंजरा ठेवण्यात आला असून या ठिकाणी बिबट्याने दर्शनसुद्धा दिले नाही. पिंजऱ्यात बिबट्यासाठी सावज ठेवले तर बिबट्या पिंजऱ्यात अडकू शकतो. परंतु पिंजरा रिकामा असल्याने या ठिकाणी बिबट्या आलेला नाही. सात हजाराची शेळी, बोकड शेतकरी घेऊ शकत नाही. त्यामुळे वन विभागाने काहीतरी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गंधारवाडी तसेच पाटाजवळ असलेल्या शेतकरी वसाहतीमधून बरेचशे विद्यार्थी शाळेत व कॉलेजला ये-जा करत असतात. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना बिबट्याच्या धास्तीने जीव मुठीत घेऊन जावे लागते. सदरच्या ठिकाणी कोणत्याही वाहनाचा उपयोग होत नसल्याने विद्यार्थ्यांना पायपीटीचा रस्ता असल्याने या ठिकाणी ते जीव मुठीत घेऊन ये-जा करतात. सायंकाळच्या वेळेस या रस्त्यावरून कोणीही जात नाही. सायंकाळनंतर शेतकरी घराच्या बाहेर पडत नाही.
बिबट्याच्या दहशतीमुळे मळ्यात शेतमजूर काम करण्यासाठी धजावत नाही. त्यामुळे येथील परिसरात शेती करणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हातचे पीक निघून जाऊ शकते, अशी स्थिती सध्या तयार झालेली आहे.
सध्या बिबट्याच्या धास्तीने शेतमजूर कामाला येत नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. येथील रहिवासी व शेतकऱ्यांना बिबट्याचे दहशतीमुळे त्यांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.
-प्रमोद पालवे, शेतकरी