

निमगाव सावा ( मिरावस्ती जुनी साकोरी वाट ) येथे रज्जाक रहिमान पटेल यांच्या शेताजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. माणिकडोह येथील निवारा केंद्रात जेरबंद बिबट्या ला हालविले असल्याची माहिती वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली.
मंगळवार (दि. 3 ) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक शेतकरी घरापुढे मिरची खुरपत होता त्यावेळी बिबट्याने जवळच चरत असलेल्या कोंबड्या पैकी एक अचानक झडप घालून पकडली आणि तो उसात पळाल्याचे शेतकऱ्याने पहिले. कोंबड्या चरत नसत्या तर कदाचित शेतात खुरपणी करणाऱ्या लोकांवर देखील बिबट्याने हल्ला केला असता. खुरपणी करणाऱ्या लोकांनी आरडाओरड केल्यावर बिबट शेजारील ऊसाच्या शेतात निघून गेला.
या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यावर त्यांनी त्वरीत पिंजरा उपलब्ध करून दिला. बुधवारी मध्य रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बिबट पिंजऱ्यात अडकला. पिंजऱ्याचा आवाज झाल्यावर स्थानिकांनी पाहिले असता त्या पिंजऱ्याजवळ दोन बिबटे डरकाळ्या फोडीत होते, एक मादी व एक पिल्लु सकाळ पर्यत त्या पिंजऱ्याजवळ ये जा करत होते.
दरम्यान वन विभागाने जरी त्या ठिकाणी एक बिबट्या पकडला असला तरी अद्यापही त्या परिसरात बिबटे असल्याने उर्वरित बिबटे पकडण्यासाठी वन खात्याने पुन्हा पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक शेतकरी करीत आहेत.