

देवळा : दुचाकीवरून जात असताना दुचाकीस्वारावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याने दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार (दि १०) सायंकाळी ७.३० च्या सुमारास देवळा तालुक्यातील रामनगर परिसरात घडली. या घटनेने परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने याची दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी ,देवळा तालुक्यातील भवरी मळा, रामननर रस्त्याने सुनिल बाबूराव ठाकरे (वय ४८) व त्यांचा मुलगा किशोर (वय १९) मोटारसायकलने आपल्या शेतात जात असताना याठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात दोघे जखमी झाले असून त्यांना दहिवडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ जितेंद्र पवार यांनी जखमींवर उपचार करून घरी पाठवले. या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून याअगोदर बिबट्याने अनेक जनावरांवर हल्ला केल्याचे नागरिकांनी सांगितले . या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून वनविभागाने याची दखल घेऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.