विशाळगड : शाहुवाडी तालुक्यातील शिरगांव येथे बिबट्याच्या हल्ल्याने गावांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शिरगांव येथील रहिवासी चंद्रकांत मारुती सावंत यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना नुकतीच घडली असून यामुळे वनविभागाने त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत सावंत यांचे कुत्रे घराच्या परिसरात बांधलेले असताना बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास अचानक हल्ला चढवला. कुत्र्याने आरडाओरड केल्याने बिबट्या तेथून पळून गेला. मात्र, या हल्ल्यात कुत्रे गंभीर जखमी झाले असून त्याला तातडीने पशुवैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत.
या घटनेमुळे शिरगाव आणि परिसरातील गावांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. बिबट्या मानवी वस्तीजवळ आल्याने लहान मुले आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतीच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या शेतकऱ्यांनीही या घटनेनंतर चिंता व्यक्त केली आहे.
वनविभागाचे दुर्लक्ष?
यापूर्वीही परिसरात बिबट्याचे दर्शन झाले असल्याच्या घटना ग्रामस्थांनी सांगितल्या आहेत. त्यामुळे वनविभागाने या भागात त्वरित गस्त वाढवावी, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा आणि ग्रामस्थांना सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी जोरकसपणे होत आहे.
शिरगांव (ता. शाहूवाडी) येथील ही घटना वन्यजीव आणि मानवी वस्तीमधील वाढता संघर्ष दर्शवते. वनविभागाने तातडीने ठोस पाऊले न उचलल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.