

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' या विशेष मोहिमेचा पार्ट टू निवडणुका संपताच वेग घेत असून, या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेने मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे.
२७ जानेवारीस नाशिक शहरात तीन ठिकाणी वाहनांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुन्हेगार कुंदन परदेशी व त्याच्या साथीदारांना गुन्हेशाखा युनिट १ मध्ये 'पोलिसी पाहुणचार' देण्यात आला. विशेष म्हणजे या टोळीत एका महिलेचा सुद्धा समावेश असून, तिला सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. खुनाचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यात हवे असलेले १० आरोपी गुन्हे शाखा युनिट १, युनिट २ आणि अंबड पोलिस ठाण्याच्या संयुक्तिक कारवाईत जेरबंद करण्यात आले आहे.
२७ जानेवारीस फिर्यादीस कुंदन परदेशी, कुणाल एखंडे व २० ते २५ साथीदारांनी 'मुलाला जिवे मारून टाकू' अशी धमकी दिली. यानंतर परिसरातील नागरिकांच्या चारचाकी वाहनांची तोडफोड केली. संशयितांनी दरवाजा फोडून फिर्यादी व पत्नीवर ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.
मात्र, प्रसंगावधान राखत पळाल्याने त्यांचा जीव वाचला. हा गुन्हा अत्यंत संवेदनशील स्वरूपाचा असल्याने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संशयितांचा तत्काळ शोध घेत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी मार्गदर्शन करत तपासाच्या सूचना दिल्या.
विशाल देवरे, विलास चारोस्कर, मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींना नाशिक ग्रामीण, धुळे जिल्हा, म. प्रदेश सीमा, म्हसरूळ परिसरात लपल्याची माहिती मिळताच सापळा रचत कुंदन परदेशी (३३), आदित्य पिंगळे (२३), कुणाल एखंडे (२५), राहुल गवारे (२१), शुभम पवार (१९), रोहित जाधव (२६), कमलेश सुराणा (२७), मानसी बेदमुथा-वाळके (३३), वेदांत परदेशी (१९), विसंवा या संशयितांना ताब्यात घेत अंबड पोलिसांच्या ताब्यात दिले. या कारवाईत उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्र राजपूत, पोलिस निरीक्षक सचिन खैरनार, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, विलास पडोळकर यांनी भाग घेतला.
छातीवर बकासुराचे गोंदण
सिनेमातील गुन्हेगारी बघून तरुण मुले आकर्षित होतात. त्याप्रमाणे दहशत करण्याचा प्रयत्न करतात. या गुन्ह्यात पकडलेल्या एकाने 'मुळशी पॅटर्न'मधील बकासुराचे नाव छातीवर गोंदलेले होते.
परदेशी टोळीत महिलेचाही सहभाग
दहशत माजविणाऱ्या गुन्हेगार कुंदन परदेशीच्या टोळीत महिलेचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. मानसी बेदमुथा-वाळके ही विवाहित महिला पतीपासून विभक्त होत सध्या परदेशीबरोबर गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे तपासात उघड झाले आहे.
'मकोका' अंतर्गत सदर गुन्हेगारांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे ते अधिकाधिक कालावधीसाठी तुरुंगात राहतील. यापुढे अशा प्रकारची दहशत जर कोणी माजविण्याचा प्रयत्न केला तर त्याची खैर केली जाणार नाही. गुन्हेगारांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. किरणकुमार चव्हाण, उपायुक्त (गुन्हे शाखा)