

लासलगाव/चांदवड : पुढारी वृत्तसेवा
केंद्राच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या ग्राहक व्यवहार विभागाने नाशिक जिल्ह्यातील रब्बी कांदा २०२६ खरेदीसाठी किमान आश्वासित खरेदी किंमत जाहीर केली आहे. त्यानुसार २६ मे २०२६ पासून कांद्याला प्रतिक्विंटल १,५८० रुपये दर लागू राहणार आहे. कृषी भवन, नवी दिल्ली येथून २५ मे रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
या पूर्वीच्या १३ मे २०२६ रोजीचा कार्यालयीन संदर्भ देत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. सहायक संचालक शिवानी गोयल यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, नाशिक जिल्ह्यात रब्बी कांदा २०२६ खरेदीसाठी किमान आश्वासित खरेदी किंमत प्रतिक्विंटल १,५८० रुपये निश्चित करण्यात आली असून, ती २६ मेपासून प्रभावी राहणार आहे.
हा आदेश सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने जारी करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. राज्यात कांद्याचे बाजारभाव उत्पादन खचपिक्षा खाली गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बाजाराला काही प्रमाणात आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्राहक व्यवहार विभागाने जरी कांद्याला १,५८० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला असला तरी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र या कांद्याला प्रतिक्विंटल जास्तीत जास्त एक हजार ८१२ रुपये, कमीतकमी ५०० रुपये तर सरासरी एक हजार ३५० रुपये इतका बाजारभाव मिळाला. कमालदराचा विचार केला तर शासनाच्या दरापेक्षा लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला अधिकचा दर मिळत असल्याचे दिसून आले आहे.