

US attack on Iran
तेहरान: अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर आणि नौकांवर भीषण हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकन सैनिक आणि युद्धनौकांच्या सुरक्षेसाठी ही मोठी कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकन सेंट्रल कमांडने म्हटले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत सागरी सुरुंग पेरणाऱ्या इराणी नौका आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रांना लक्ष्य करत अमेरिकेने हा हल्ला चढवला.
'सेंटकॉम'चे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अमेरिकन सैन्याने दक्षिण इराणमध्ये स्वसंरक्षणार्थ हे हवाई हल्ले केले. इराणकडून निर्माण झालेला धोका नष्ट करण्यासाठी ही कारवाई करणे भाग होते. सध्या सुरू असलेल्या युद्धविरामाचे अमेरिका पालन करत आहे, मात्र आपल्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' च्या दोन नौका होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये समुद्री सुरुंग पेरताना आढळून आल्या. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी हा प्रकार टिपताच अमेरिकन नौदल आणि हवाई दलाने तातडीने संयुक्त कारवाई केली. अवघ्या काही मिनिटांतच अमेरिकेने या दोन्ही इराणी नौका समुद्रातच उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला आहे.
या कारवाईदरम्यान अमेरिकन सैन्याने इराणच्या 'बंदर अब्बास' या किनारपट्टीच्या भागात असलेल्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र तळावरही अचूक मारा केला. या इराणी क्षेपणास्त्र तळावरून अमेरिकेच्या लढाऊ विमानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने हा क्षेपणास्त्र तळ आणि तिथली लष्करी यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त केली.
अमेरिकेचे हे हल्ले मर्यादित स्वरूपाचे होते. इराणसोबतचा वाद अधिक वाढवण्याचा अमेरिकेचा कोणताही हेतू नाही आणि या कारवाईचा अर्थ 'युद्धविराम संपला' असा घेतला जाऊ नये, असे अमेरिकन प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, या घडामोडींमुळे अखाती देशांतील तणाव वाढला आहे.
या लष्करी कारवाईदरम्यान दक्षिण इराणमधील बंदर अब्बास, सीरिक आणि जास्क या भागात प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले. इराणी माध्यमांनीही या स्फोटांच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे सर्व भाग जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात, कारण जगातील बहुतांश कच्चे तेल याच मार्गाने निर्यात होते. सध्या ही लष्करी कारवाई थांबली असली, तरी अमेरिकन सैन्य हाय अलर्टवर आहे.