नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधुग्रामची उभारणी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या १८२५ झाडांच्या कत्तलीवरून महापालिका विरुद्ध पर्यावरणप्रेमी असा संघर्ष कायम असताना या जागेवर पीपीपी तत्वावर एक्झिबिशन सेंटर उभारण्याची २२० कोटींची निविदा महापालिकेने जारी केल्याने नवा वाद उभा राहिला आहे. एक्झिबिशन सेंटरच्या मक्तेदाराला तपोवनातील जागा उपलब्ध करून देण्यासाठीच वृक्षतोडीचा घाट रचला गेल्याचा आरोप आता पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
नाशिकमध्ये येत्या २०२६ - २७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्याची जोरदार तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे. प्रयागराज येथील सिंहस्थाचा अनुभव लक्षात घेता नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गत कुंभमेळ्याच्या तुलनेत चार ते पाच पट गर्दी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरणासह महापालिका, जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.
सिंहस्थात येणाऱ्या साधू-महंतांच्या निवास व्यवस्थेसाठी यंदा तपोवनातील १२०० एकर जागेवर साधुग्रामची उभारणी प्रस्तावित आहे. या साधुग्रामसाठी १८२५ झाडे तोडण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने नाशिकमध्ये मोठा संघर्ष उभा राहिला आहे. महापालिकेच्या या प्रस्तावाला नागरिक, पर्यावरणप्रेमींनी हरकत घेत कडाडून विरोध दर्शवला आहे. आंदोलन सुरू केले आहे. पर्यावरणप्रेमींच्या या आंदोलनाला सेलिब्रेटींसह राजकीय पक्षांकडूनही मोठा पाठिंबा लाभत आहे. २०१५ पूर्वीची मोठी झाडे तोडली जाणार नाही, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्तांनी दिले असले तरी पर्यावरणप्रेमी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. हा वाद कायम असतानाच साधुग्रामच्या जागेवर पीपीपी तत्वावर एक्झिबिशन सेंटर उभारण्याची महापालिकेची निविदा चर्चेत आली आहे. या एक्झिबिशन सेंटरच्या उभारणीसाठी मक्तेदाराला जागा मोकळी करून देण्यासाठीच वृक्षतोडीचा घाट घातला गेल्याचा आरोप आता पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे.
एक्झिबिशन सेंटरच्या उभारणीसाठी तपोवनातील वृक्षतोडीचा घाट घातला गेल्याचे निविदेवरून स्पष्ट होत आहे. जे सत्य प्रशासनाकडून लपवले जात होते ते निविदा सूचनेतून समोर आले आहे. प्रशासनाकडून नाशिककरांची दिशाभूल केली जात असून साधु-महंतांच्या भावनांचाही अनादर केला जात आहे.
रोहन देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते.
तपोवनात एक्झिबिशन सेंटर उभारणीसाठी निविदा जारी करण्यात आली आहे. सिंहस्थकाळात एक्झिबिशन सेंटरचा डोम साधुंच्या निवासव्यवस्थेसाठी वापराला जाईल. सिंहस्थानंतर एक्झिबिशन सेंटर म्हणून वापर केला जाणार असून त्यामाध्यमातून महापालिकेला महसूल मिळेल. तपोवनात २०१५पूर्वीच्या झाडांची कत्तल केली जाणार नाही. केवळ लहान झाडे, झुडपे हटवली जातील.
मनिषा खत्री, आयुक्त, नाशिक महापालिका.