

नाशिक : सतीश डोंगरे
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम उद्योग क्षेत्रावर होत आहे. जिल्ह्यातील तब्बल २०० उद्योग व्हेंटिलेटरवर असल्याची स्थिती आहे. मागणीच्या तुलनेत अल्प एलपीजी गॅसचा पुरवठा केला जात असल्याने मोजक्याच कामगारांना सोबत घेत ठरावीक वेळेसाठी उद्योग सुरू ठेवले जात आहेत.
मागील महिनाभरापासून ही स्थिती असल्याने, या उद्योगांना सुमारे ७०० कोटींचा फटका सोसावा लागला आहे. सध्या युद्धविरामाचे संकेत मिळत असले तरी, परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी किमान दोन महिने लागणार असल्याने, हा काळ उद्योगांसाठी आव्हानात्मक असणार आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या झळा नाशिकच्या उद्योग क्षेत्राला पहिल्या दिवसापासूनच सोसाव्या लागत आहेत.
विशेषतः ऑटोमोबाइल आणि पावडर प्लेटिंग कोटिंग उद्योगाला याचा मोठा फटका बसत आहे. उद्योगांना लागणारा एलपीजी गॅस मागणीच्या तुलनेत अजूनही उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. नाशिकची मुख्य औद्योगिक वसाहत असलेल्या अंबडमध्ये पावडर कोटिंग प्लेटिंग उद्योगांची संख्या मोठी आहे.
हे उद्योग नाशिकची मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एबीबी, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, सिमेन्स या बड्या उद्योगांचे सप्लायर्स आहेत. त्यामुळे हे उद्योग प्रभावित झाल्याने त्याचा थेट परिणाम बड्या उद्योगांवर होत आहे. एलपीजी गॅस सिलिंडर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने, तसेच खासगी एजन्सीकडून चढ्या दराने सिलिंडर दिले जात असल्याने पेंट आणि पावडरच्या किमतीत दीडपट वाढ करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत १९ किलोचे व्यावसायिक सिलिंडर २,१५० रुपयांना मिळते. मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठाच होत नसल्याने, सल्याने, उद्योग पूर्णक्षमतेने सुरू ठेवणे अवघड होत आहे. गेल्या १ एप्रिलपासून दोन सिलिंडर दिले जात असले तरी, त्यातून २४ तास उत्पादन सुरू ठेवले अशक्य असल्याने उद्योजक खासगी एजन्सीकडून चढ्यादराने एलपीजी सिलिंडर मिळवत आहेत.
खासगी एजन्सीकडे ३३ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी तब्बल साडेसात हजार रुपये उद्योजकांना मोजावे लागत असल्याने, उद्योजकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान, युद्धाची धग कमी होण्याचे संकेत असले तरी, परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी किमान दोन महिने या परिस्थितीचा उद्योग क्षेत्राला सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
मार्चअखेर उद्दिष्ट अपूर्ण
उद्योग क्षेत्रासाठी मार्च अखेर अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उद्योगासमोर असते. मात्र, यंदा पेट्रोलियम पदार्थांच्या तुटवड्यामुळे बहुतांश उद्योगांना आपले मार्चअखेरचे उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. परिणामी, याचा थेट परिणाम उद्योगाच्या बॅलन्स शीटवर होणार आहे.
निर्यातीवर परिणाम नाशिकच्या
उद्योग क्षेत्रातील उत्पादनांची विविध देशांत निर्यात केली जाते. मात्र, युद्धामुळे निर्यातीवरही मोठा परिणाम झाला आहे. सध्या शिपिंग बऱ्यापैकी ठप्प आहे. जे कंटेनर पाठवले जातात, त्यांनी शिपिंग दर वाढवले आहेत. याशिवाय उत्पादन घटल्याने, निर्यात बऱ्यापैकी घटली आहे.