

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बाबी समोर येत आहेत. या प्रकरणात संशयित आरोपींकडून महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी ठराविक आणि योजनाबद्ध 'मोडस ऑपरेंडी' वापरली जात असल्याचे निष्पन्न झाले.
लैंगिक शोषणासोबतच धर्मातर घडवून आणण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याने या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. या संदर्भातील पहिली तक्रार २५ मार्चला दाखल झाली होती. पीडित महिलेच्या वर्तनात अचानक झालेल्या बदलामुळे तिच्या कुटुंबीयांचा संशय बळावला.
पूर्वी आधुनिक आणि मोकळ्या विचारांची राहणीमान असलेली ही महिला अचानक पारंपरिक वेशभूषा परिधान करत उपवास करू लागली. तिच्या वागण्यात मोठा बदल दिसला. घरच्यांनी तिला विश्वासात घेतले असता तिने कंपनीत चालणाऱ्या सर्व प्रकारांचा धक्कादायक खुलासा केल्याने हे प्रकरण उघडकीस आले.
कंपनीतील वरिष्ठ पदांवर कार्यरत असलेले आरोपी महिलांशी वेगवेगळ्या कारणांनी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते. सुरुवातीला किरकोळ स्वरूपाच्या कृतींतून जसे कागद डोक्यावर मारणे, खांद्यावर हात ठेवणे किंवा विनाकारण संपर्क साधणे, यातून ते महिलांशी ओळख वाढवत होते. त्यानंतर या वर्तनाचे स्वरूप गंभीर होत असे. यातून लैंगिक छळ व मानसिक दबाव निर्माण केला जात होता.
जी महिला या प्रकारांना विरोध करत असे, तिला कामाच्या ठिकाणी त्रास देणे, कामाचा ताण वाढवणे किंवा इतर मार्गाने छळ करण्यात येत होता. या प्रकरणातील महिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचेही तपासात स्पष्ट झाले. अल्प वेतनावर काम करणाऱ्या महिलांकडून दर महिन्याला ठराविक रक्कम उकळली जात असल्याचे ऑनलाइन व्यवहारांतून उघड झाले.
यात एका पुरुषाचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याची बाब समोर आली. त्याचे मूळ नाव बदलण्यात आले. आहाराच्या सवयी बदलत व्यक्तिमत्त्व विशिष्ट धार्मिक चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला पोलिस त्याच्याकडे संशयित म्हणून पाहत होते. मात्र, तो स्वतःच पीडित असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी संवेदनशीलपणे हाताळले प्रकरण
या प्रकरणाचा तपास पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय पद्धतीने हाताळला गेला. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने महिनाभरापासून या प्रकरणावर बारकाईने काम केले. पीडित महिलांना विश्वासात घेणे, त्यांची ओळख सुरक्षित ठेवणे आणि कोणतीही माहिती बाहेर न जाण्याची दक्षता घेण्यावर पोलिसांनी भर दिला. या पार्श्वभूमीवर तपास अधिक सखोल होत असून, आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.