नाशिक : आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाल्याने आणि धरणांतील विसर्गदेखील घटविल्याने गोदावरी नदीचा पूर ओसरला आहे. तीन दिवसांपासून गंगापूर धरणातून 6,336 क्यूसेक वेगाने सुरू असलेला विसर्ग बुधवारी (दि. ९) 2,205 क्यूसेकवर आणल्याने जलस्तर नियंत्रणात आला आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सर्वाधिक 8.8 मिमी पावसाची नोंद इगतपुरीत झाली. तर सर्वात कमी येवला (0.8 मिमी), कळवण (0.9) तालुक्यात झाली.
सध्या पावसाचा जोर ओसरल्याने जनजीवन सुरळीत होत आहे. पुढील चार दिवस ग्रीन अलर्ट देण्यात आला असून, हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी दिवसभरात 2.4 मिमी पावसाची नोंद झाली. पावसाने उघडीप दिल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
गत महिन्याभरापासून पावसाने थैमान घातले होते. परिणामी, यंदा जुलै महिन्यातच जिल्ह्यातील धरणांची पातळी 55 टक्क्यांवर गेली. १० वर्षांत पहिल्यांदाच जुलै महिन्यात गंगापूर धरणाने ६५ टक्क्यांची पातळी ओलांडली. पावसाळ्याने अजून तीन महिने शिल्लक असल्याने दारणा, कडवा, पालखेड, गंगापूर धरणांतून पाणी सोडण्यात आल्याने नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. आतापर्यंत 'जायकवाडी'ला 20 टीएमसी पाणी गेले आहे.
धरण - क्यूसेक
दारणा - 1100
गंगापूर - 2205
पालखेड -696
पुणेगाव -550
भोजापूर -539
भावली -481
भाम -1245
वालदेवी -599
आळंदी - 243
कश्यपी -1000
कडवा -804
करंजवण -630
नांदूरमध्यमेश्वर बंधारा -12,620