

Increase in discharge from Gangapur, Godavari river floods again
नाशिकः पुढारी वृत्तसेवा
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरासह जिल्हयात पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये मंगळवारी (दि.१) रात्रभर मुसळधार पाऊस झाला असून ढगफुटीसदृश्य वातावरण निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. या पावसाचे पाणी गंगापूर धरणात पोहोचल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली.
त्यामुळे गंगापूर धरणातून दुपारी चार वाजता २ हजार १३२ क्युसेकने विसर्ग करण्यात करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी सांगितले. यामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे.
गत आठवड्यात शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले होते. जिल्ह्यात सर्व दूरच पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी धरणाच्या पातळीत वेगाने वाढ झाली. दारणा धरणातून ९३९ क्यूसेक गतीने विसर्ग वाढवण्यात आले आहे. पालखेड धरणातून ७९६ क्यूसेस इतका विसर्ग वाढवण्यात आले असून त्यामुळे १५९२ क्यूसेक गतीने विसर्ग सुरू आहे. नांदूर मधमेश्वरमधून सर्व धरण समूहातून विसर्ग सुरू आहे. बुधवारी १० ते १२ वाजेपर्यंत विसर्ग शून्य होता. त्यानंतर पाणी पातळीत वाढ झाल्याने विसर्ग सुरू करण्यात आला.
सकाळी सहा वाजता १६१४ क्यूसेस विसर्ग, सकाळी नऊ वाजता वाढवून ४८४२ क्यूसेस गतीने विसर्ग तर सकाळी दहा वाजता १२,६२० क्युसेस गतीने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे धरण पाणलोट परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाद्वारे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावर असल्यास तात्काळ हलविण्यात यावी. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासकीय विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन शहाणे यांनी केले आहे.