

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गोदावरी नदी प्रदूषणप्रकरणी पर्यावरणप्रेमी राजेश पंडित यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेच्या सुनावणीदरम्यान राज्याच्या मुख्य सचिवांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. गोदावरी प्रदूषण रोखण्यात झालेल्या दिरंगाईसंदर्भात दाखल या याचिकेत विविध विभागांतील तब्बल १९९ अधिकाऱ्यांची नावे न्यायालयात सादर केली आहेत. दरम्यान, अंबड - सातपूर परिसरातील नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक २५० कोटी रुपयांच्या निधीतील दोन तृतीयांश वाटा देण्यास एमआयडीसीने नकार दिल्यामुळे प्रकल्प अंमलबजावणीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पंडित यांनी गोदा प्रदूषणप्रकरणी यापूर्वी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने अवमान याचिका दाखल केली असून, प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी आणि संबंधित यंत्रणांच्या जबाबदारीचा मुद्दा उपस्थित केला आहे. या प्रकरणात मुख्य सचिवांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतींतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या सीईटीपीचे काम ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर तीन महिने चाचणी घेऊन फेब्रुवारीअखेर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केला जाईल, असे शासनाने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. मात्र, अंबड सातपूर परिसरासाठी स्वतंत्र एसटीपी उभारण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यातील दोन तृतीयांश निधी एमआयडीसीने आणि एक तृतीयांश निधी महापालिकेने उचलावा, असे निर्देश मुख्य सचिवांनी दि. ४ नोव्हेंबर रोजी दिले होते. मात्र, एमआयडीसीने निधी देण्यास स्पष्ट नकार देत, आपली भूमिका लेखी स्वरूपात कळविली आहे. त्यामुळे एसटीपी उभारणीतील आर्थिक अडथळा कायम आहे. गोदावरी प्रदूषणप्रकरणी सुरू असलेल्या अवमान याचिकेची पुढील सुनावणी दि. ११ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना आणि संबंधित विभागांच्या जबाबदारीबाबत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
पाणी वळविण्याची तात्पुरती व्यवस्था : नंदिनी नदीचे पाणी गोदावरीला मिळण्यापूर्वी आगरटाकळी एसटीपीकडे वळविण्यात येत असल्याची माहिती मनपाने न्यायालयात दिली आहे. मात्र, पावसाळ्यात आणि आगामी सिंहस्थ काळात ही व्यवस्था व्यवहार्य नसल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिले. गोदावरी नदीचे पाणी मानवी वापरासाठी अयोग्य असून, आरोग्यासाठी घातक असल्याचे स्पष्ट करणारे मोठे फलक नदी परिसरात लावावेत, अशी मागणी केली आहे.
सन २०१२ पासूनचे अधिकारी रडारवर
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुख्य सचिवांनी गोदावरी नदी प्रदूषणप्रकरणी जबाबदारीच्या कक्षेत येणाऱ्या विविध विभागांतील १९९ अधिकाऱ्यांची नावे न्यायालयात सादर केली आहेत. यामध्ये २०१२ पासून नाशिक महापालिकेत कार्यरत सर्व आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि गोदावरी संवर्धन कक्षाचे उपायुक्त यांचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील २००९ पासूनचे जॉइंट डायरेक्टर, प्रादेशिक व उपप्रादेशिक अधिकारी तसेच फिल्ड ऑफिसर यांचीही नावे दिली आहेत. याशिवाय एमआयडीसीच्या संबंधित प्रादेशिक आणि उपप्रादेशिक अधिकाऱ्यांचाही समावेश या यादीत आहे.