Nashik UBT Opposes Non-Tender Drainage Approval|मलवाहिका विनानिविदा मंजुरीला 'उबाठा'चा विरोध

स्थायी समितीचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी
keshav porje
keshav porje
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पंचवटी, सिडकोसह नाशिक पूर्व विभागात अमृत २ योजनेंतर्गत विनानिविदा मंजूर केलेल्या अडीच कोटींच्या मलवाहिकांच्या कामांना शिवसेना (उबाठा) गटनेते केशव पोरजे यांनी आक्षेप घेतला आहे. स्थायी समितीने मंजूर केलेला ठराव रद्द करण्याची मागणी पोरजे यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात पोरजे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. अमृत २ योजनेंतर्गत आरसीसी कामांसह अन्य आवश्यक बांधकामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी महापालिकेने कार्यादेश दिल्याचा उल्लेख निवेदनात आहे. या कामांमध्ये पाइपलाइनसाठी आवश्यक खोदकाम, पाइप फाउंडेशन, आरसीसी पाईप इनकॅप्स्युलेशन, शोरिंग आदी बाबींचा समावेश आहे. या कामांसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्याऐवजी महापालिका अधिनियमातील कलम ६७ (क) अंतर्गत कामे मंजूर केली. यामुळे स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेला फाटा देऊन ठरावीक कंत्राटदारांना कामे देण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे.

ही कामे खरोखरच आपत्कालीन स्वरूपाची आहेत का, कामे विनानिविदा देण्याची आवश्यकता काय होती, तसेच आधीच्या कामांच्या कंत्राटदारांनाच अतिरिक्त कामे दिली आहेत का, याची माहिती मागविली आहे.

सरकारी नियमानुसार २० लाख रुपयांहून अधिक किमतीच्या कामांसाठी ऑनलाइन निविदा प्रक्रिया राबविणे आवश्यक असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सुमारे दोन कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया का राबविली नाही, असा प्रश्न त्यांनी केला आहे. संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करून, संबंधित प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेत रद्द करावा, अशी मागणी पोरजे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.