

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आखाती देशातील युद्धामुळे विमान इंधनाचे दर चांगलेच भडकल्याचा फटका नाशिक विमानसेवेला बसला असून, गोवा, हैदराबाद विमानसेवा मंगळवार (दि. १६) पासून तूर्त स्थगित करण्यात आली आहे. १ सप्टेंबरपासून ही सेवा पूर्ववत होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तोपर्यंत प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
इराण-अमेरिका युद्धामुळे इंधन कोंडी निर्माण झाली. त्यामुळे एव्हिएशन टर्बाइन फ्युअल (एटीएफ) या विमान इंधनाच्या दरात ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंधन दरासह करांत सवलत न दिल्यास सेवा आणखी घटवण्याचा इशारा विमान कंपन्यांनी केंद्र सरकारला मे महिन्याच्या प्रारंभीच दिला होता.
एअर इंडिया व इंडिगो या कंपन्यांनी आपल्या सेवांत प्रत्येकी २२ टक्क्यांनी कपातीची घोषणा केली होती. त्यानुसार नाशिकच्या हैदराबाद व गोवा या दोन विमानसेवा तूर्त स्थगित करण्यात आल्या आहेत. यात नाशिक येथील ओझर विमानतळ येथून असलेल्या दोन पलाइटपैकी एक बंद होत आहे. त्यामुळे प्रवाशांना एकमेव विमानावर अवलंबून राहावे लागणार आहे.
हे विमान नाशिक येथून १२.०५ वाजता हैदराबादसाठी उड्डाण घेते, तर तिकडून सायंकाळी ५.१० वाजता परतते. तर गोव्याची विमानसेवा पूर्णतः बंद होणार आहे. ओझर विमानतळावरील नवी दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू या विमानसेवा नियमित सुरू राहणार आहे.
दरम्यान, 'इंडिगो'ने हा निर्णय केवळ नाशिकसाठी घेतलेला नाही. मुंबई, छत्रपती संभाजीनगरसह अन्य अनेक ठिकाणी सेवेत कपात करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे .
सध्या नाशिकच नव्हे, जगभरातील विमानसेवेवर परिणाम होत आहे. अमेरिका-इराण युद्ध शमले असले, तरी परिस्थिती पूर्वपदावर येण्यास काही काळ लागणार आहे. त्यानंतर सेवा पूर्ववत होतील.
- मनीष रावल, उपाध्यक्ष, निमा