

देवळा (जि. नाशिक) : तालुक्यातील महालपाटणे येथे गिरणा नदीत बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह गुरुवारी (दि.10) सकाळी आढळून आला असून घरातील कर्तामाणूस गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
गणेश निंबा गांगुर्डे (वय २८, रा. महालपाटणे) हा तरुण मंगळवार (दि.8) रोजी रात्री मासेमारीसाठी गिरणा नदीपात्रात गेला होता. तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. स्थानिक तरुणांनी दोन दिवस नदीपात्रात शोधमोहीम राबवली. अखेर गुरुवार (दि.10) रोजी सकाळी गणेशचा मृतदेह गावालगतच्या नदीपात्रात आढळून आला.
घटनास्थळी देवळा पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
गणेश गांगुर्डे हे घरातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वृद्ध आई व भाऊ असा परिवार आहे. सायंकाळी गावात अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.