

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवाला आता जेमतेम आठवडाभराचाच कालावधी शिल्लक असताना, मंजुरीसाठी प्राप्त ४३५ मंडळांच्या अर्जांपैकी केवळ पाचच मंडळांच्या परवानगीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली आहे. महापालिकेच्या बांधकाम, अग्निशमन तसेच पोलिस व शहर वाहतूक शाखेच्या ना हरकत दाखल्यांना विलंब होत असल्यामुळे परवानगीची प्रक्रिया रखडली आहे. Nashik Ganeshotsav
येत्या १९ सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर यंदा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होणार आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी आपली तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या मंडप नियमावलीनुसार सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी महापालिकेची परवानी घेणे मंडळांवर बंधनकारक आहे. त्यासाठी पोलिस, अग्निशमन, शहर वाहतूक शाखेकडून ना हरकत दाखला व महावितरणकडून अधिकृत वीजजोडणी घेणेदेखील आवश्यक आहे. विविध परवानग्या घेताना मंडळांची दमछाक होऊ नये, यासाठी महापालिका, पोलिस, शहर वाहतूक शाखेची संयुक्त ऑनलाइन एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. ऑनलाइन एक खिडकी योजने अंतर्गत आतापर्यंत ४३५ मंडळांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. मात्र त्यापैकी अवघ्या पाचच मंडळांना अधिकृत परवानगी मिळू शकली आहे, तर ४३० मंडळांचे अर्ज प्रलंबित आहेत. नाशिक पूर्व विभागातील ५० पैकी २, तर नाशिक पश्चिम विभागातील ६६ पैकी केवळ ३ मंडळांनाच परवानगी मिळू शकली आहे. पंचवटीतील ९८, नवीन नाशिक ७५, सातपूर ९४, तर नाशिकरोड विभागातील सर्वच ५२ मंडळांचे अर्ज प्रलंबित आहेत. Nashik Ganeshotsav
प्रक्रियेला गती देण्याची मागणी
महापालिकेच्या अग्निशमन, पोलिस व शहर वाहतूक शाखेकडील ना हरकत दाखल्याला होणाऱ्या विलंबामुळे मंडळांचे अर्ज परवानगीविना प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला गती देण्याची मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून केली जात आहे.
अशी आहे विभागनिहाय स्थिती
विभाग मंडळांचे एकूण अर्ज परवानगी दिलेले अर्ज
नाशिक पूर्व ५० २
नाशिक पश्चिम ६६ ३
पंचवटी ९८ ०
नवीन नाशिक ७५ ०
सातपूर ९४ ०
नाशिकरोड ५२ ०
एकूण ४३५ ५
हेही वाचा :