

देवगावच्या शेतकऱ्याने बियाण्यांची विक्री करून आलेले पैसे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मनीऑर्डरद्वारे पाठवले
Ironic comment : 'हे पैसे वापरून माझ्यासाठी एक रमीचा डाव खेळा आणि काही रक्कम जिंकून मला पाठवा'
सततच्या पावसाने पाणी साचून जमीन नापीक झाली. पेरणीच करता आली नाही. त्यामुळे रमीचा डाव जिंकून मला आर्थिक मदत करा - शेतकऱ्याची शासनाच्या धोरणांवर नाराजी
Farmer Hits Back at Agriculture Minister Manikrao Kokate's Rummy Video - 'Play Rummy for me, win and send it to me'
विंचूर (नाशिक) : निफाड तालुक्यातील देवगाव येथील एका शेतकऱ्याने सततच्या पावसामुळे पेरणी न झाल्याने पडून असलेल्या बियाण्यांची विक्री करून आलेले पैसे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मनीऑर्डरद्वारे पाठवले आहेत. 'हे पैसे वापरून माझ्यासाठी एक रमीचा डाव खेळा आणि काही रक्कम जिंकून मला पाठवा' अशी उपरोधिक टिप्पणी करत शासनाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे.
योगेश राजेंद्र खुळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या गट क्रमांक ३३७/३ मधील शेतजमिनीत पेरणीसाठी त्यांनी प्रत्येकी १८५० रुपये किंमतीच्या तीन पिशव्या बियाणे विकत घेतले. मात्र, सततच्या पावसाने पाणी साचून जमीन नापीक झाली. पेरणीच करता आली नाही. या परिस्थितीला अनेक शेतकरी तोंड देत असताना त्याकडे शासन लक्ष देत नसल्याने, खुळे यांनी बियाणे विक्री करुन ते पैसे कृषिमंत्र्यांना मनीआर्डर केले. शिवाय, या पैशातून रमीचा डाव जिंकून आपल्याला आर्थिक मदत करण्याचीही अपेक्षा व्यक्त करत एकप्रकारे 'सभागृहातील रमी व्हिडीओ'चा निषेध नोंदवला आहे.
अती पावसाने शेती उद्ध्वस्त झाली, नशिबाने साथ दिली नाही. पेरणीच नाही तर उत्पन्न कुठून येणार? मला रमीचं काही ज्ञान नाही, शेतीही पडीक पडली आहे. बियाणं विकून मिळालेले ५५५० रुपये मी कृषिमंत्र्यांना मनीऑर्डर केलेत. त्यांनी माझ्यासाठी रमी खेळावी आणि जिंकल्यास पैसे पाठवावेत.
योगेश खुळे, आपत्तीग्रस्त शेतकरी, देवगाव