

Manikrao Kokate
मुंबई : शेतकऱ्यांसंदर्भात विधानांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे नव्या वादात सापडले आहेत. नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत बसून कोकाटे हे आपल्या मोबाईलवर रमी हा पत्त्यांचा गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर राजकीय वादंगाला तोंड फुटले असताना कोकाटे यांनी मला रमी खेळता येत नाही, ऑनलाईन रमी खेळलो नाही, असा दावा केला आहे. यामध्ये दोषी आढळलो तर नागपूरच्या अधिवेशनात राजीनामा देईन, असे कोकाटे यांनी म्हटले आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यसरकारच्या कृषी समृद्धी योजनेची घोषणा केली. यावेळी रमी प्रकरणावर बोलताना कोकाटे म्हणाले की, ऑनलाईन रमी खेळत असताना बँक खाते, मोबाईल नंबर संलग्न असतो. असं कोणतही खात माझ नाही. माझ्यावर ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आणि बदनामी केली, त्यांना कोर्टात खेचणार आहे. युट्यूबवर रमीची आलेली जाहीरात स्कीप करताना व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले पण, पूर्ण व्हिडिओ दाखवला नाही. मी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी लेखी पत्र देणार आहे. या प्रकरणात दोषी असतील त्या सर्वांची सीडीआर चौकशी करावी. जर मी सभागृहात ऑनलाईन रमी खेळताना दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री किंवा उपमंत्र्यांनी निवेदन करावे, यानंतर मी त्यांना न भेटता राज्यपालांकडे राजीनामा देईल.
हा छोटा विषय आहे, लांबला का कळलं नाही. आजपर्यंत कधीच मी राम्मी खेळलो नाही. माझी बदनामी केली जात आहे. ज्या नेत्यांनी बदनामी केली त्या सर्वांना मी कोर्टात खेचनार. जाहीरात स्कीप करायला ३० सेकंद लागतात, माझा १८ सेकंदाचा व्हिडीओ बनवला. पूर्ण व्हिडीओ दाखवला असता तर कळलं असत, असे कोकाटे म्हणाले. राजीनामा देण्यासारख काही घडलेलं नाही. मी काही विनयभंग केला का? माझी गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आहे का? असा सवाल त्यांनी केला. विरोधक काय बोलतात यांच्याकड मी लक्ष देत नाही. मला नियमांची काळजी आहे. व्हिडिओ कुणी काढला माहिती नाही. पण ज्यांनी बदनामी केली त्यांना नोटीस पाठवणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.