

Manikrao Kokate Rummy Video
विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधान परिषद सभागृहात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला. याची आता चौकशी सुरु आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंना तारतम्य ठेवून वागण्याचा सल्ला दिला आहे.
''सभागृहाच्या आतमध्ये जे काही घडले, त्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी चौकशी लावली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार सत्तेत आल्यानंतर भान ठेऊन वागा, अशा सक्त सूचना दिल्या होत्या. मला कृषिमंत्री कोकाटे यांच्याशी समोरासमोर बोलायचे आहे. सोमवारी ते बोलतील. ते भिकारी म्हणाले, याबाबतदेखील मी त्यांच्याशी बोलणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही एकत्रित निर्णय घेऊ, असे अजित पवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
त्यांनी मागेदेखील असंच वक्तव्य केलं. दुसऱ्यांदादेखील असंच घडलं. नक्की काय आहे हे सध्या तपासलं आहे. मी समोरासमोर चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकदाच सांगतो, दम द्यायच बंद करा. एकदाच काय तो पेन-ड्राईव्ह, तुमच्याकडे असणारे व्हिडिओ बाहेर काढा. एकदाच काय ते लोकांसमोर येऊ द्या, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे.
अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे-पाटील हे रुग्णालयातून थेट रुग्णवाहिकेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना झालेत. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय घाडगे भेटायला येत आहेत. मला माहिती मिळाली आहे. कुणीही भेटायला येऊ शकतं, असे अजितदादांनी म्हटले आहे.
महादेव मुंडे प्रकरणाचा रिपोर्ट आता आला आहे. आम्ही कारवाई करत आहोत, असेही ते म्हणाले.
आज विविध बैठका झाल्या. कामाला गती देण्याच्या दृष्टीने बैठका झाल्या आहेत. केंद्रातून आपल्याला अल्पसंख्याक समाजासाठी निधी मिळायचा होता. परंतु वसुली झाली नाही म्हणून केंद्राने निधी बंद केला आहे, असेही त्यांनी सांगितले.