नाशिक : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी द्वारका चौकातील काठे गल्लीपासून ते सारडा सर्कलपर्यंत वाहनांसाठी भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया तातडीने राबवण्यात येणार असून, ती डिसेंबरअखेर पूर्ण केली जाईल. त्यानंतर कामास त्वरित सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
मंत्री भोसले हे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने नाशिक दौर्यावर आले होते. द्वारका सर्कल परिसराची पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्रीकांत ढगे, राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता इम्रान शेख, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत व सहायक पोलिस आयुक्त अद्विता शिंदे उपस्थित होते.
भोसले यांनी सांगितले की, प्रस्तावित भुयारी मार्ग ६०० मीटर लांबीचा व सुमारे १५ मीटर उंचीचा असणार आहे. यासाठी २४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कुंभमेळ्यादरम्यान नाशिकमधील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी हे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये २२०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाल्याचे भोसले यांनी सांगितले. सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी संबंधित अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
या कामांत सहभागी ठेकेदारांच्या प्रलंबित देयकांसाठी १५०० कोटी रुपयांचे वाटप आधीच करण्यात आले आहे. उर्वरित ८०० कोटी रुपयेही लवकरच वितरित केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. द्वारका सर्कलवरील सध्याच्या भुयारी मार्गाबाबत विचारले असता त्या मार्गाचा सध्याच्या प्रकल्पात उपयोग होऊ शकतो का, हे तपासून त्यानुसार निर्णय घेतला जाईल असे सांगितले. तथापि, काठे गल्ली ते सारडा सर्कल दरम्यानच्या नव्या भुयारी मार्गाची उभारणीची प्रक्रिया त्वरित सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एमएसआरडीसीने या प्रकल्पाचा प्रस्ताव आधीच तयार करून पाठवला आहे. हा द्वारका अंडरपास प्रकल्प सुरू झाल्यानंतर नाशिकरोडवरून शहरात प्रवेश करताना होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.