

नाशिक :ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण न करणाऱ्या 2516 नागरिकांवर महापालिकेने नोटिसा बजावत दंडात्मक कारवाई केली आहे. या नागरिकांकडून जवळपास अडीच लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता सर्वेक्षण सुरू असून, यंदा या स्पर्धेचे नववे वर्ष आहे. गेल्या नऊ वर्षांत एकदाही नाशिकचा पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये समावेश होऊ शकलेला नाही. त्यामुळे आता महापालिकेने ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण सक्तीचे केले आहे.
विलगीकरण नसलेला कचरा न स्वीकारण्याचे निर्देश घंटागाडी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. एवढेच नव्हे तर कचरा विलगीकरण करण्यास असहकार्य करणाऱ्या घरगुती ग्राहकांपासून तर व्यावसायिक आस्थापनांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. कचरा विलगीकरण न करणाऱ्या नागरिकाकडून प्रत्येकी 300 रुपये, तर व्यावसायिकांकडून 500 तर हॉटेल्स आणि बारचालकांकडून पाच हजार रुपयांपर्यंत दंड वसूल केला जात आहे.
दि. 29 सप्टेंबरपासून ही मोहीम सुरू झाल्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत जवळपास 2 हजार 516 ग्राहकांकडून 2 लाख 43 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
नाशिकरोडला सर्वाधिक दंडवसुली
नाशिकरोड विभागात सर्वाधिक 404 ग्राहकांवर कारवाई करून 1 लाख 4 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्या खालोखाल सातपूरमध्ये 1 हजार 130 ग्राहकांना नोटीस बजावून 10 हजार 500 रुपये, पंचवटीत 750 नोटीस बजावून 50 हजार रुपये, नाशिक पूर्वमध्ये 105 जणांना नोटीस बजावून 32 हजार 100 रुपये, नवीन नाशिकमध्ये 57 जणांना नोटीस बजावून 22 हजार 100 रुपये, नाशिक पश्चिममध्ये 70 जणांना नोटीस बजावून 24 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.