

Nashik Diwali Celebration Lakshmi Pujan
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दीपपर्वातील मुख्य दिवस असलेल्या दर्श अमावास्येला मंगळवारी (दि. २१) घरोघरी विधिवत लक्ष्मी कुबेर पूजन उत्साहात करण्यात आले. शुभमुहूर्तावर गृहस्थांनी घर, कार्यालयात व व्यावसायिक आस्थापनांमध्ये लक्ष्मीचे विधिवत पूजन करून सुख, समृद्धी, शांती व मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली. धन-धान्याच्या बरकतीसाठीही लक्ष्मीमातेकडे साकडे घातले.
दिव्यांच्या प्रकाशात उजळलेली घरे, रांगोळ्यांनी सजलेले अंगण आणि सुगंधी फुलांच्या सजावटीमुळे घरोघरी सणाचा आनंद दाटून आला होता. स्त्रियांनी पारंपरिक परिधानात लक्ष्मीची पूजा मांडली. पंचांगानुसार, लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळी ५.४६ ते रात्री ८.१८ वाजेपर्यंतचा शुभ मुहूर्त असल्याने अनेकांनी हा मुहूर्त साधत लक्ष्मी कुबेरची पूजा केली. पूजेसाठी अष्टदल कमल किंवा स्वस्तिक, अक्षता, धूप-दीप, नैवेद्य (लाडू, मिठाई, फळे, धने, लाह्या) आणि आरतीचे साहित्य यासारख्या गोष्टी पूजेमध्ये मांडून, गणपती देवता, लक्ष्मी, भगवान कुबेराची मूर्ती, प्रतिमा ठेवून मंत्रोपच्चारात पूजा करण्यात आली.
कार्यालये, आस्थापनांमध्येही मंत्रोपचार करून पूजा करीत, बरकतीसाठी साकडे घातले. तसेच संपत्ती मिळविण्यासाठी 'ओम श्रीं ह्रीं क्लीम' या बीजमंत्राचा कमळाच्या माळेने १०८ वेळा जप करण्यात आला. पूजेनंतर नारळ, बत्ताशे, लाह्या, पेढे याचा प्रसाद देण्यात आला. पूजेभोवती लावलेल्या दिव्यांनी संपूर्ण घर व परिसरात प्रकाशमान झाले होते. लक्ष्मीपूजनानंतर अनेक घरांमध्ये कौटुंबिक मेजवानी, फराळाचे आयोजन केले होते.
व्यावसायिक संस्थांनी देखील आपल्या कार्यालयात लक्ष्मीपूजन करून नववर्षासाठी चांगल्या सुरुवातीची अपेक्षा व्यक्त केली. काही सामाजिक संस्थांनी दिवाळी निमित्त गरजूंना अन्नवाटप व कपड्यांचे वितरण करून सामाजिक बांधिलकी जपली. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने नाशिक शहर आनंद, उत्साह आणि भक्तिभावाने उजळून निघाले.
फटाक्यांची आतषबाजी लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी
करण्यात आली. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नाशिककरांना आवाहन केले होते. त्यास नाशिककरांनी दाद देत, कमी आवाजाचे फटाके फोडण्यास प्राधान्य दिले. रात्री उशिरापर्यंत शहरात फटाक्यांची आतषबाजी केली जात होती.