

'Mega rush' for return journey after Diwali
नाशिक : पूर्वा गोर्डे दिवाळीनिमित्त आपल्या गावी गेलेल्या लाखो लोकांनी परतीच्या प्रवासासाठी आतापासूनच बुकिंग सुरू केले आहे. त्यामुळे रेल्वे, बस आणि विमान वाहतुकीवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांची झुंबड उडाल्यामुळे अनेक मार्गावर तिकीट मिळणे अवघड झाले आहे, तर काही ठिकाणी मिळेल त्या दरात तिकीट खरेदी करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
वाढत्या मागणीचा फायदा घेत खासगी बसेस आणि टॅक्सी ऑपरेटरनी तिकीट दरात तब्बल अवाच्या सव्वा दरवाढ केली आहे. नाशिकसह अनेक प्रमुख शहरांच्या मार्गांवर तिकिटांचे दर दोन ते तीन पटींनी वाढले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेही दिवाळीच्या काळात अतिरिक्त खर्च भरून काढण्यासाठी दि. १५ ऑक्टोबर ते५ नोव्हेंबरदरम्यान १० टक्के भाडेवाढ लागू केली आहे. रेल्वे गाड्यांना 'वेटिंग' असल्याने अनेक प्रवासी नाइलाजाने महागडे खासगी पर्याय निवडत आहेत. दरवाढीमुळे लाडक्या बहिणींचा परतीचा प्रवास महागला आहे.
वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी रेल्वे आणि एसटीने अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्या असल्या, तरी गर्दीपुढे त्या अपुऱ्या ठरत आहेत. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना वाहतूक कोंडीचा आणि वाढलेल्या दरांचा विचार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नाशिक शहरात सुमारे ४० खासगी बस ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत. त्यांच्या मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अलिबाग, पेण, पनवेल, जळगाव, भुसावळ, हिंगोली, परभणी, जालना, लातूर, नागपूर, अमरावती आदी शहरांपर्यत खासगी बससेवा आहेत. या मार्गावर ३१ ऑक्टोबरपर्यंत तिकिटे बुक झालेली आहेत. परराज्यात अहमदाबाद, सूरत, भडोच, वापी, मेहसाना, जयपूर, इंदूर या लांब पल्ल्याच्या सेवाही सुरू आहेत. या मार्गासाठी यंदा प्रचंड बुकिंग झालेले आहे. कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी प्रामुख्याने या शहरात दिवाळीनिमित्त घरी गेले आहेत.
४० कोटींची उलाढाल
खासगी बस ट्रॅव्हल्स येत्या १० दिवसांत सुमारे ३० ते ४० कोटी रुपयांची उलाढाल करतील, असा अंदाज आहे. एसटीला या काळात सुमारे ७० कोटींचा अतिरिक्त व्यवसाय मिळेल, तर रेल्वे सुमारे २०० कोटी रुपये अतिरिक्त मिळवेल, असा अंदाज परिवहन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.