

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पोलिस व मनपा आयुक्त यांच्याशी ओळख असल्याचे भासवून फटाक्याच्या दुकानाच्या परवान्यासाठी १२ लाखांची फसवणूक व एक लाख रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या दोघांविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखा युनिट १ कडून या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. सचिन रमेश मोगल (रा. चंदनेश्वर नगर, जुना सायखेडा रोड, नाशिक), तौसिफ इब्राहीम शेख (रा. श्री श्री रविशंकर मार्ग, नाशिक) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सारंग प्रताप चांदे (रा. धोंगडेनगर, नाशिकरोड) यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
सचिन मोगल व तौसिफ शेख या दोघांनी सारंग चांदे यांना फटाक्याच्या दुकानासाठी परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवले. वडाळा रोड येथील हॉटेल बरकतजवळ त्यांनी भेट दिली आणि पोलिस आयुक्त, अग्निशमन दल, अतिक्रमण विभागाचे आयुक्त व विभागीय आयुक्त यांच्याशी ओळख असल्याचा बनाव केला. त्यांनी महाराष्ट्र शासनाचा सही, शिक्का व शासकीय मोहोर असलेला बनावट परवाना दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
फटाक्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या अग्निशमन विभागाची 'ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) व पोलिस आयुक्त कार्यालयाचा परवाना मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांनी फिर्यादीकडून १२ लाख रुपये घेतले. प्रत्यक्षात, संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी अशा कोणत्याही परवान्यांची मागणी केलेली नव्हती.
संशयितांनी बनावट दस्तऐवज सादर करून फसवणूक केली. त्यानंतर, फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन एक लाख रुपयांची खंडणीसुद्धा उकळली. पोलिसांनी दोघांना अटक केली.