

नाशिक : जिजा दवंडे
भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्याचा बहुतांश भाग छत्रपती संभाजीनगरला अधिक जवळचा आणि सोयीचा आहे. इगतपुरी व त्र्यंबकेश्वर वगळता येवला, नांदगाव, निफाड, मालेगाव, सिन्नर, देवळा, चांदवड, सटाणा आदी तालुक्यांमधून छत्रपती संभाजीनगरला जाणे तुलनेने सुलभआहे. मात्र, सध्याच्या व्यवस्थेत बहुतेक तालुक्यांतील पक्षकारांना प्रथम नाशिक आणि त्यानंतर मुंबई असा खर्चिक व वेळखाऊ प्रवास करावा लागत आहे.
भौगोलिक वास्तव, सामाजिक गरज आणि न्यायसुलभतेचा विचार करता नाशिक जिल्हा छत्रपती संभाजीनगर खंडपीठाला जोडणे ही केवळ प्रशासकीय बाब नसून तो न्यायव्यवस्थेने न्यायाकडे टाकलेले ठोस पाऊल ठरेल.
नाशिक जिल्हा सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रधान खंडपीठाशी जोडलेला असला, तरी या व्यवस्थेमुळे जिल्ह्यातील पक्षकार, साक्षीदार आणि वकिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबईला पोहोचण्यासाठी लागणारा दीर्घ प्रवास, प्रचंड दगदग, वाढलेला आर्थिक खर्च, तसेच महानगरातील वास्तव्यातील अडचणी पाहता नाशिक जिल्हा छत्रपती संभाजीनगर खंडपीठाशी जोडणे ही काळाची गरज बनली आहे.
नाशिकची भौगोलिक रचना, रस्ते व दळणवळणाचा विचार करता छत्रपती संभाजीनगर ही नैसर्गिक न्यायिक जोड ठरते. शिवाय नाशिकचा ग्रामीण व निमशहरी भाग छत्रपती संभाजीनगरच्या वातावरणाशी अधिक सुसंगत आहे. तेथील न्यायालयात मराठी भाषेचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने पक्षकारांना न्यायप्रक्रिया समजून घेणे सुलभ होते. या उलट मुंबई उच्च न्यायालयात इंग्रजी भाषेचा प्राधान्याने वापर होत असल्याने अनेक सामान्य पक्षकारांमध्ये दुरावा निर्माण होतो.
न्याय हा केवळ निर्णयापुरता मर्यादित नसून तो सुलभ, परवडणारा आणि सर्वसामान्यांना समजणारा असावा, या मूलभूत तत्त्वानुसार नाशिक जिल्ह्याचा छत्रपती संभाजीनगर खंडपीठात समावेश करणे अत्यंत आवश्यक ठरत आहे. समृद्धी महामार्गाचा या तालुक्यांना अधिक लाभ नांदगाव, येवला, मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवड आदी तालुक्यांना समृद्धी महामार्गावर सहज प्रवेश करता येतो, परिणामी छत्रपती संभाजीनगर गाठण्यासाठी वेळेत मोठी बचत होते. समृद्धी महामार्गामुळे नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमधून छत्रपती संभाजीनगर गाठणे हे आज प्रत्यक्ष प्रवासाच्या दृष्टीने अधिक जवळचे, जलद व सुलभ झाले असून, भौगोलिक न्यायाच्या दृष्टीने ही जोडणी अधिक तर्कसंगत आहे.
मुंबईला पोहोचण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. नाशिकमधील सर्व जिल्हे छत्रपती संभाजीनगरला जोडलेले असताना केवळ नाशिक जिल्हा मुंबईशी जोडणे सुसंगत वाटत नाही. आता तरी याबाबत सुधारणा होऊन नाशिक जिल्हा छत्रपती संभाजीनगर खंडपीठाशी जोडला जावा. -
अॅड. राम नागरे, नाशिक
मुंबई न्यायालय नाशिकसाठी अडचणीचे आहे. आता उच्च न्यायालयाच्या इमारतीचे काम सुरू झाल्याने त्या ठिकाणी पोहोचताना न्यायापेक्षा त्याचा त्रासच अधिक होणार आहे. आता न्याय मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. नाशिक छ. संभाजीनगरला जोडणे आवश्यक आहे.
- अॅड. हर्षल केंगे, नाशिक
नाशिक जिल्हा बहुतांशी ग्रामीण भाग आहे. बहुतांश तालुके छ. संभाजीनगरला जोडलेले आहेत. आता समृद्धीमुळे छत्रपती संभाजीनगर अधिकच जवळ आले आहे. सर्वांत महत्त्वाचे पक्षकाराला कमी वेळेत न्याय मिळण्यासाठी नाशिक जिल्हा छत्रपती संभाजीनगरला जोडणे आवश्यक आहे.
अॅड. अभिजित हिरे, नाशिक
मुंबई उच्च न्यायालयातील वकील, तेथील न्याय वेगळा असल्याचा खोटा समज निर्माण झालेला आहे. वास्तवात छत्रपती संभाजीनगर खंडपीठ नाशिक जिल्ह्यासाठी भौगोलिक, प्रवास, खर्च सर्वच बाबतीत सोयीचे आहे. नाशिक छत्रपती संभाजीनगरला जोडावे, अशी आमगी मागणी आहे.
अॅड. विनय कटारे, नाशिक