

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाविकास महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीपाठोपाठ आघाडीतही मोठी बंडखोरी झाली आहे. ही बंडखोरी शमविण्यासाठी गुरुवारी (दि.१) आयोजित करण्यात आलेली बैठक निष्फळ ठरली आहे.
एकाच प्रभागात महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे निर्माण झालेला तिढा काही केल्या सुटत नसल्याने मैत्रीपूर्ण लढतीशिवाय पर्याय बैठकीत पुढे आल्याचे कळते. यावर महाविकास आघाडीची शुक्रवारी (दि.२) पुन्हा बैठक होणार आहे. अर्ज माघारीच्या दिवशी नेमके किती उमेदवार माघार घेतात याकडे आता लक्ष लागून आहे.
महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना (उबाठा), मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस या पक्षाच्या शहरातील प्रमुख नेत्यांनी गुरुवारी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीस काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव, शरद आहेर, उल्हास सातभाई, स्वप्निल पाटील, राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष गजानन शेलार, गोकुळ पिंगळे, छबू नागरे, मनसेचे डॉ. प्रदीप पवार, अतुल चांडक, सलीम शेख उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे माजी आमदार वसंत गिते, दत्ता गायकवाड व शहराध्यक्ष डी. जी. सूर्यवंशी सहभागी झाले.
दोन टप्प्यात तब्बल चार तास मॅरेथॉन बैठक होऊनही काही जागांवर तोडगा न निघाल्याने ही बैठक फिस्कटली. प्रामुख्याने शिवसेना (उबाठा) पक्षाने १०१ ठिकाणी उमेदवार देऊन मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेसची कोंडी केली. हाच कित्ता मनसेसह राष्ट्रवादी व काँग्रेसने गिरविला. त्यामुळे १२२ जागांसाठी महाविकास आघाडीचे १६० पेक्षा अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रत्येकाला निवडणूक लढविण्याची अपेक्षा असल्यामुळे माघार घ्यायला सहजासहजी कुणीही तयार होत नसल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. पक्षाला जागा सोडायची तर 'इलेक्टिव्ह मेरिट' काय, याचेही कोडे सुटत नसल्याने महाविकास आघाडीत गोंधळ निर्माण झाला आहे. एकमत होत नसल्याने महाविकास आघाडीला आता मैत्रीपूर्ण लढतीशिवाय पर्याय राहिलेला नाही.
नेत्यांनी घेतला काढता पाय
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागावाटपाविषयी तोडगा काढण्यासाठी आयोजित बैठकीत वादंग झाल्याची चर्चा आहे. तब्बल चार तास चर्चा करूनही निष्फळ ठरलेल्या बैठकीतून नेत्यांना नाईलाजाने काढता पाय घ्यावा लागला. काँग्रेसने अगोदर राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर मनसेच्या नेत्यांबरोबर झालेल्या चर्चेतून निवडक ठिकाणी तोडगा निघाला.