

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये झालेले आयारामांचे प्रवेश, निष्ठावंतांना डावलून आयारामांना उमेदवारीसाठी घातलेल्या पायघड्या, एबी फॉर्मवाटपावरून झालेला गोंधळ, त्यातून पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचे एबी फॉर्म बाद होण्याचे प्रकार आणि शेवटी निष्ठावंतांच्या संतापाचा कडेलोट झाल्यामुळे थेट शहराध्यक्षांनाच कोंडण्याच्या घडलेल्या प्रकारामुळे शहरातील राजकारण चांगलेच तापले आहे.
पक्षात नव्याने आलेल्या आयारामांना दिलेले प्राधान्य आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची झालेली उपेक्षा यामुळे भाजपच्या तिन्ही आमदारांची मोठी कोंडी झाली आहे. या साऱ्या घडामोडींमुळे नाशिक भाजप राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. आयारामांच्या प्रवेशाला आमदार देवयानी फरांदे यांनी ठाम विरोध दर्शविला होता. मात्र, हा विरोध डावलत मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेशसोहळा पार पडला. त्यामुळे पक्षातील अंतर्गत अस्वस्थता उघडपणे समोर आली.
निष्ठावंतांची बाजू घेताना आमदार फरांदे भावुक झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाल्याची घटना पक्षातील दरी अधिक ठळक करून गेली. या राड्यानंतर उमेदवारी वाटपातही आयारामांचीच सरशी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. एबी फॉर्म वाटपावरून भाजपमध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला. निष्ठावंत उमेदवारांना एबी फॉर्म न मिळाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
शहराध्यक्षांच्या वाहनाचा पाठलाग, जोरदार घोषणाबाजी, धक्काबुक्की आणि हाणामारीपर्यंत प्रकरण गेले. या प्रकारामुळे भाजपची मोठी नामुष्की होत नाशिक शहर भाजप राज्यभर चर्चेत आले. या घटनेचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशीही उमटले. सिडको परिसरात एबी फॉर्मवरून हायव्होल्टेज ड्रामा रंगला. मुकेश शहाणे यांच्यासह भाजपच्या चार अधिकृत उमेदवारांचे एबी फॉर्म बाद ठरल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेनंतर आमदार सीमा हिरे आणि सुधाकर बडगुजर यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा पेटल्याचे दिसले. हिरे समर्थक उमेदवारांचे एबी फॉर्म बाद झाल्याने भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली. तिसऱ्या दिवशी नाशिकरोड भागात निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संताप अधिकच तीव्र झाला. उमेदवारी न मिळाल्याचा जाब विचारण्यासाठी शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालण्यात आला. शहराध्यक्षांना कोंडण्यापर्यंत इच्छुकांची मजल गेली. हा सारा प्रकार नाशिक पूर्व मतदारसंघात घडल्यामुळे आमदार राहुल ढिकले यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली.
भाजपसाठी धोक्याची घंटा
नाशिक भाजपमध्ये सलग तीन दिवस घडलेल्या घटनांनी पक्षातील अंतर्गत विसंवाद, असंतोष आणि गटबाजी उघड झाली आहे. आयारामांचे स्वागत आणि निष्ठावंतांची नाराजी या संघर्षाचा परिणाम निवडणुकीत काय होतो, हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र, सध्या तरी आयारामांच्या राजकारणामुळे भाजपचे तिन्ही आमदार निष्ठावंतांच्या रोषाच्या केंद्रस्थानी आले आहेत.
नेतृत्वाने आयारामांना प्राधान्य दिल्याचा आरोप
प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि अॅड. राहुल ढिकले हे नाशिकमधील भाजपचे तिन्ही आमदार आयारामांच्या निर्णयांमुळे आता थेट निष्ठावंतांच्या रोषाला सामोरे जात आहेत. शहराध्यक्ष सुनील केदार हे निष्ठावंतांच्या रोषाच्या केंद्रस्थानी दिसत आहेत. पक्षनेतृत्वाने आयारामांना प्राधान्य दिल्याचा आरोप होत असून, त्याचा फटका पक्षाला बसत असल्याचे चित्र आहे.