

नाशिक : न्यायालयाच्या पवित्र आवारातच कौटुंबिक वादाचे कुरूप रूप समोर आले. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सोमवारी (दि. २) दुपारी बाराच्या सुमारास पतीने पत्नी व तिच्या वडिलांवर हल्ला केल्याची घटना घडली. न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मारहाणीने उपस्थितांत एकच खळबळ उडाली.
पती-पत्नीमधील वाद न्यायालयात प्रलंबित असून, पत्नीने भारतीय नागरिक सुरक्षा कायदा २०२३ च्या कलम १४४ अंतर्गत निवाऱ्यासाठी अर्ज दाखल केला आहे. यासंदर्भात दोघेही सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाले होते. मात्र, त्या दिवशी न्यायालय रजेवर असल्याने सुनावणी होऊ शकली नाही.
दरम्यान, प्रवेशद्वाराजवळच दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. पतीने पत्नी व तिच्या वडिलांवर हात उगारल्याचा आरोप आहे. घटनेवेळी उपस्थित असलेले अॅड. सुनील म्हैसधुणे यांनी तत्परता दाखवत हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांच्या मध्यस्थीमुळे पुढील अनर्थ टळल्याचे सांगितले जाते.
घटनेनंतर दोन्ही पक्षांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला आहे. न्यायालयाच्या आवारातच घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षेच्या प्रश्नावरही चर्चा रंगू लागली.