नाशिक : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर अचानक पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नव्या लागवडीसही फटका बसला असून भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. परिणामी बाजारात आवक कमी झाल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी झालेल्या लिलावात कोथिंबिरीला तब्बल १२ हजार ५०० रुपये शेकडा, तर मेथीला ९ हजार रुपये शेकडा असा उच्चांकी दर मिळाला.
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधारेमुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले, तर काही ठिकाणी भाजीपाला पिके अक्षरशः कुजली. त्यानंतर आठवडाभर पाऊस थांबल्याने नवीन लागवड आणि वाढीवरही परिणाम झाला. या दुहेरी संकटामुळे बाजारातील भाजीपाल्याची आवक सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे. कमी पुरवठ्यामुळे प्रमुख पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
रविवारी झालेल्या लिलावात कोथिंबिरीने १२ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठला, तर हायब्रीड कोथिंबीर ९ हजार ५०० रुपये, मेथी ९ हजार रुपये, शेपू ८ हजार ३०० रुपये आणि कांदापात ८ हजार ५०० रुपये शेकडा दराने विकली गेली. याचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसून येत असून, कोथिंबिरीची जुडी १०० ते १२० रुपये, तर मेथीची जुडी ८० ते १०० रुपये दराने विकली जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या शाळा सुरू झाल्याने वसतिगृहांमध्ये व लग्नसराई सुरु असल्यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. मात्र, उत्पादन घटल्याने आणि आवक कमी असल्याने दर तेजीत कायम आहेत. वाढलेल्या भावांमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळत असला, तरी सर्वसामान्य ग्राहकांच्या स्वयंपाकघराचे बजेट मात्र कोलमडले आहे.
पावसाचा लहरीपणा कायम राहिल्यास आगामी काळातही भाजीपाल्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.